पुणे(प्रतिनिधी) – शहरातील एका नामांकित हॉटेलमधील थाळीवर सूट असल्याची बतावणी करत सायबर भामट्याने मगरपट्टा सिटी भागातील महिलेला तब्बल एक लाख 44 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकणी एका 38 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात भामट्याच्या विरुद्ध आयटी ऍक्टसह फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ह्या मगरपट्टा सिटी भागात राहायला आहेत. त्यांच्या मोबाइलवर भामट्याने संपर्क साधला. शहरातील एका नामांकित उपाहारगृहातील थाळीवर सूट देण्यात येणार आहे, अशी बतावणी भामट्याने महिलेकडे केली.
थाळीची नोंदणी करण्यासाठी एक लिंक पाठवितो, असे चोरट्याने महिलेला सांगितले. चोरट्याने महिलेला पाठविलेल्या लिंकमधून त्यांची वैयक्तिक माहिती घेतली.
महिलेला बोलण्यात गुंतवून चोरट्याने महिलेच्या बॅंक खात्याची माहिती भामट्याने घेतली. त्यानंतर त्याच माहितीच्या आधारे महिलेच्या बॅंक खात्यातून चोरट्याने एक लाख 44 हजार 497 रुपये लांबविले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास गुन्हे निरीक्षक राजू अडागळे करत आहेत.