France : अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनच्या एका मुलाला फ्रान्समध्ये परत येण्यापासून रोखण्याचे फ्रान्सचे प्रयत्न सुरू आहेत, असे फ्रान्सच्या गृहमंत्रालयाने म्हटले आहे. ओमर बिन लादेन हा फ्रान्सच्या नॉर्मंडी प्रदेशात राहत होता. परंतु फ्रेंच अधिकाऱ्यांनी त्याचे निवासी कागदपत्रे मागे घेतले आणि त्याला देशाबाहेर काढण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतर ऑक्टोबर २०२३ मध्ये त्याने देश सोडला होता. त्या वेळी अधिकाऱ्यांनी त्याला दोन वर्षांसाठी फ्रान्सला परत येण्यास मनाई केली होती, असे गृह मंत्रालयाने सांगितले. ओमर बिन लादेन कोणत्याही कारणास्तव फ्रान्समध्ये परत येऊ शकणार नाही याची खात्री करण्यासाठी अतिरिक्त बंदी लादल्याचे फ्रान्सचे गृहमंत्री ब्रुनो रिटेललेऊ यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
ओमर बिन लादेन आता कतारमध्ये राहतो आहे. तो पूर्वी २०१६ पासून नॉर्मंडीच्या ऑर्न प्रदेशात त्याच्या ब्रिटीश पत्नीसह राहत होता आणि एक कलाकार म्हणून काम करत होता. फ्रान्समध्ये परत येण्यावरील बंदी रद्द करण्यासाठी कायदेशीर लढाई गेल्या आठवड्यात तो हरला आहे.
त्यामुळे तो आता कायदेशीर मार्गाने फ्रान्समध्ये येऊ शकणार नाही, हे निश्चित झाले आहे. फ्रेंच अधिकाऱ्यांनी त्याला दहशतवादाबद्दल सहानुभूती दर्शविलेल्या सोशल मीडिया पोस्टसाठी देशाबाहेर जाण्याचे आदेश दिले होते. असे रिटेललेऊ म्हणाले.
ओमर बिन लादेनचा पिता ओसामा बिन लादेन हा ११ सप्टेंबर २००१ च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. २०११ मध्ये अमेरिकेच्या यूएस नेव्ही नौदल सीलच्या कमांडोनी पाकिस्तानमध्ये केलेल्या कारवाईमध्ये तो मारला गेला होता.