पॅरिस – युद्धग्रस्त युक्रेन मधील अणू प्रकल्पांच्या सुरक्षेसाठी आता फ्रांन्सने पुढाकार घ्यायचे ठरवले आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या कार्यालयाने म्हटले आहे की फ्रान्स तर्फे युक्रेनच्या पाच मुख्य अणू प्रकल्पांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी लवकरच ठोस उपाययोजना प्रस्तावित केल्या जातील.
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या निकषांच्या आधारे हे सुरक्षा उपाय तयार केले जातील, असे फ्रान्सच्या अध्यक्षांनी शनिवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. युक्रेन मधील एका अणुऊर्जा प्रकल्पावरील रशियन हल्ल्यामुळे तेथे शुक्रवारी आग लागली होती आणि त्यामुळे जगभरात आपत्तीची भीती निर्माण झाली होती.रशियाची ही कृती धोकादायक होती अशी टीकाहीं फ्रान्सने केली आहे.
अध्यक्ष मॅक्रॉन यांनी म्हटले आहे की, रशियाने आपल्या बेकायदेशीर आणि धोकादायक लष्करी कारवाया ताबडतोब थांबवाव्यात आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांना युक्रेनच्या आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त सीमेवरील सर्व आण्विक सुविधांवर पूर्ण नियंत्रण द्यावे.युक्रेन मधील अणू प्रकल्पांच्या सुरक्षेसाठी रशियाने आम्हाला तेथे विना अडथळा प्रवेश द्यावा असे आवाहनही फ्रान्सने रशियाला केले आहे.