#ENGvIND 4th Test : इंग्लंडविरुद्धची चौथी कसोटी आजपासून, संघ निवडीचे भारतासमोर आव्हान

लंडन –विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आजपासून यजमान इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात मैदानात उतरणार आहे. या सामन्यात संघ निवड हेच भारतीय संघ व्यवस्थापनासमोर आव्हान राहणार आहे. सात फलंदाज व चार गोलंदाज खेळवण्यावर कोहलीचा भर राहणार हे देखील संकेत मिळाले आहेत.

या सामन्यासाठी संघ निवड करताना कोहलीसमोर सलामीसह मधल्या फळीतील फलंदाजीचाही प्रश्‍न आहे. सलामीवीर लोकेश राहुलने पहिल्या सामन्यात शतकी खेळी केली होती. मात्र, त्यांनतर त्याला चमक दाखवता आली नाही. हिटमॅन रोहित शर्मानेही प्रत्येक सामन्यात सुरुवात चांगली केली असली तरीही त्याला मोठी खेळी करता आलेली नाही. चेतेश्‍वर पुजारा सातत्याने अपयशी ठरत होता. मात्र, त्याने हेडिंग्लेवर 91 धावांची खेळी करत आपण भरात येत असल्याचे संकेत दिले होते. मात्र, तरीही कोहली त्याला खेळवण्याचा जुगार खेळणार का हा देखील प्रश्‍न आहे.

मधल्या फळीतील तंत्रशुद्ध फलंदाज अजिंक्‍य रहाणे याला संघात स्थान मिळाले तर तो स्वतःला नशीबवान समजेल. रहाणेला या संपूर्ण मालिकेत दर्जाला साजेसा खेळ करता आलेला नाही. त्यामुळे चौथ्या कसोटीत सूर्यकुमार यादव, पृथ्वी शॉ, शार्दूल ठाकूर व हनुमा विहारी यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. तसेच पायाला झालेल्या दुखापतीमुळे रवींद्र जडेजा या सामन्यात खेळू शकणार नसल्यामुळे रवीचंद्रन अश्‍विनला संधी मिळणार हे जवळपास निश्‍चित आहे.

या सामन्या कोहली चार वेगवान गोलंदाज खेळवणार का इशांत शर्माला वगळून एक जादा गोलंदाज खेळवणार याबाबत सकाळी खेळपट्टी पाहिल्यावरच निर्णय घेतला जाईल अशी शक्‍यता आहे. नॉटिंगहॅम कसोटी अनिर्णित राहिल्यावर भारताने लॉर्डसवर विजय मिळवला होता. मात्र, त्यानंतर हेडिंग्लेचा सामना अत्यंत दारूण पद्धतीने गमावल्यावर भारतीय संघावर कडाडून टीका होत आहे. संघात मोठे बदलही व्हावेत, अशी मते अनेक समिक्षकांनी व्यक्त केल्याने कोहलीवर दबाव आहे. त्यातच त्याची कामगिरीही सरस होत नसल्याने त्यालाही आता भरात येण्यासाठी एका मोठ्या खेळीची गरज आहे.

दुसरीकडे इंग्लंड संघानेही आपल्या संघात काही बदल होणार असल्याची शक्‍यता वर्तवली आहे. त्यासाठीच मार्क वुड व ख्रिस वोक्‍स यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. या सामन्यात प्रमुख वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याला विश्रांती दिली जाण्याची शक्‍यता असली तरीही अंतिम निर्णय सामन्याच्या नाणेफेकीपूर्वी होणार असल्याचेही सांगितले जात आहे.

या मालिकेनंतर अँडरसन निवृत्ती घेणार असल्याचे बोलले जात असले तरीही आगामी ऍशेस मालिका डोळ्यासमोर असताना तो असा काही निर्णय घेईल अशी शक्‍यताही दिसून आलेली नाही. उलट याच मालिकेतून ऍशेस मालिकेसाठी चांगला सराव मिळवण्याचा त्याचा प्रयत्न राहील.

कोहली भरात येणार का?

गेले जवळपास दीडपेक्षा जास्त वर्षे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी केलेली नाही. या मालिकेतही त्याने मोठी खेळी केलेली नाही. त्याच्या अपयशामुळेच भारतीय संघ सुस्थितीतून पराभूत झाला आहे. त्यामुळे या सामन्यात तरी कोहलीची बॅट तळपेल का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.