दुकान अन् सदनिका फोडण्याच्या घटना आणि विनयभंग, लुटमारीचे प्रकार वाढले
पुणे – चतु:शृंगी पोलीस ठाण्यात हद्दीत घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांनी थैमान घातले आहे. मागील काही दिवसांत एकाच वेळी तीन ते चार दुकान तसेच घरफोडीचे गुन्हे घडत असतानाच आता स्ट्रिट क्राईमही वाढत आहे. त्यामुळे चतु:शृंगी पोलीस ठाणे हद्दीत ना घर सुरक्षित आहे ना रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, औंध परिसरात गुरुवारी सायंकाळी अवघ्या अर्ध्या तासाच्या कालावधीत चोरट्यांनी एकाच इमारतीतील तीन सदनिका फोडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
हरविंदर बेदी ( औंध) यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार अनोळखी चोरट्याविरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या सोसायटीमध्ये प्रवेश केला तसेच फिर्यादींच्या दरवाजाचे कुलूप उचकवटून घरफोडी केली. चोरट्यांनी त्या इमारतीमधील दुसरी कुलूप बंद सदनिका आणि आणखी एक सदनिकेचा कडीकोयंडा उचकवटून चोरीचा प्रयत्न केला. फिर्यादी बेदी या सव्वा सात वाजता घरी परतल्यानंतर त्यांना सदनिका फोडल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, या घरफोडीबाबत चतु:शृंगी पोलिसांशी वारंवार संपर्क करूनही माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी पानटपरीचा माल पुरवठा करणाऱ्या तरूणास धारदार शस्त्राचा धाक दाखवून कार थांबविण्यास सांगून मारहाण केली. तसेच त्याच्याकडे जमा झालेल रोकड जबरदस्तीने लुटुन नेली. तसेच औंध भागातील अपोलो हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या औषध विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.
सुतारवाडी परिसरात मंदिर परिसरात खेळणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अनोळखी व्यक्तीने अत्याचार केला. चतु:शृंगी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले पुणे विद्यापीठातही मुलींची सुरक्षितता धोक्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अनोळखी युवकाने सायंकाळी रस्त्याने जाणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या घटनेमुळे शैक्षणिक राजधानी असलेल्या पुण्यात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे पोलिसांचा अंकुश राहिलेला नाही.