आयपीएलचा चौदावा महासंग्राम महाराष्ट्रात?

नवी दिल्ली -करोना महामारीमुळे लांबणीवर पडलेल्या आयपीएलचा 13वा हंगाम नुकताच युएईत यशस्वीपणे पार पडला आहे. यानंतर आयपीएलच्या चौदाव्या मोसमाची आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे. याबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु सद्यपरिस्थिती आणि एकूण वेळापत्रक पाहता ते पुढील वर्षी एप्रिलमध्ये होण्याची शक्‍यता असून युएईच्या धर्तीवरच ते महाराष्ट्रात होण्याची चर्चा आहे. 

आयपीएलच्या 14व्या हंगामाबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या स्पर्धेला 10 एप्रिलच्या सुमारास सुरूवात होऊ शकते. कारण इंग्लंडचा भारत दौरा 28 मार्च रोजी संपणार आहे. त्यानंतर आयपीएल 2021चे आयोजन करण्याची शक्‍यता आहे.
बीसीसीआयने नुकतीच दोन महिन्यांच्या भारत-इंग्लंड दौ-याची घोषण केली आहे.

या काळात भारत-इंग्लंडमध्ये चार कसोटी, पाच टी-20 आणि तीन वनडे मालिका खेळण्यात येणार आहे. या दौ-याची सुरूवात 5 फेब्रुवारी रोजी चेन्नई कसोटीपासून होणार आहे. यानंतर पुण्यात पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेने त्याचा अखेर होणार आहे.

या पार्श्‍वभूमीवर आयपीएल एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होण्याची आशा आहे. त्याआधी बीसीसीआय खेळाडूंचा लिलाव करू शकते. त्यामुळे खेळाडूंना त्यांच्या नव्या खेळाडूंशी समन्वय साधता येईल. पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये आणखीन नवीन संघाचा समावेश होणार असून याचा निर्णय 24 डिसेंबर रोजी होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात येणार आहे. बीसीसीआय आयपीएलचा 14वा हंगाम भारतातच घेणार आहे.

13व्या हंगामा प्रमाणेच संपूर्ण स्पर्धा मर्यादीत 3 मैदानावर घेतली जाऊ शकते. युएईमध्ये दुबई, अबुधाबी आणि शारजा मैदानावर सर्व सामने खेळविण्यात आले होते. जोपर्यंत करोना परिस्थिती ठिक होत नाही तोपर्यंत सामने कमीत कमी मैदानावर घेण्याचा भर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलचा 14वा हंगाम महाराष्ट्रात होऊ शकतो. मुंबईत वानखेडे आणि ब्रेबोर्न हे दोन दोन आंतररष्ट्रीय मैदान आहेत. त्याचबरोबर पुणे आणि नागपूरमध्ये देखील आंतरराष्ट्रीय मैदान आहेत. यामुळे बीसीसीआयच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.