मतदान प्रक्रियेत साडे चौदा हजार कर्मचारी

मावळ लोकसभा ः सर्वाधिक मतदार आणि कर्मचारी पनवेल विधानसभा मतदार संघात

600 जवानांचे ऑनलाईन मतदान
निवडणूक आयोगाने देशभरातील जवानांसाठी ऑनलाईन पध्दतीने मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. मावळ लोकसभा क्षेत्रातील कित्येक जवान सीमेवर देशाच्या संरक्षणासाठी तैनात आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी अद्यापपर्यत 600 जवानांनी ऑनलाईन पध्दतीने मतदानाचा हक्क बजाविला आहे. यामध्ये, 583 पुरुष तर 17 स्त्रियांनी मतदान केले आहे.

पिंपरी  – मावळ लोकसभा मतदार संघाची निवडणूक 29 एप्रिल रोजी होणार आहे. मतदानास आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले असल्याने एकीकडे उमेदवार प्रचारासाठी दिवस-रात्र एक करत आहेत, तर दुसरीकडे प्रशासनाने देखील मतदान प्रक्रिया शांतीपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी कंबर कसली आहे. मतदारसंघाचा विस्तार मोठा असल्याने प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाल्या आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश असून त्यासाठी 14 हजार 448 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक मतदान केंद्रावरती करण्यात आली आहे. याचबरोबर, मावळ लोकसभा मतदारसंघात 22 लाख 27 हजार 733 मतदार असून त्या ठिकाणी 2 हजार 504 मतदान केंद्राचा समावेश करण्यात आलेला आहे.


अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची करण्यात आलेली नेमणूक पाहता प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी सुमारे सहा अधिकारी-कर्मचारी उपस्थित असतील. तर सरासरी 154 मतदारांमागे एक कर्मचारी असणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघ मोठा असून या मतदारसंघात पनवेल, कर्जत, उरण या कोकण पट्टयांतील तीन मतदारसंघाचा समावेश होतो. लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच, मावळ मतदारसंघात पनवेल विधानसभा मतदारसंघ सर्वात मोठा असून 5 लाख 14 हजार 902 मतदारांसाठी 584 मतदान केंद्र असून त्या ठिकाणी 3260 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच, सर्वात कमी मतदान कर्जत विधानसभा मतदारसंघाचे 2 लाख 75 हजार 477 एवढे असून त्या ठिकाणी 2087 कर्मचारी आहेत.

मावळ मतदारसंघातील मतदार केंद्रात व्हीव्हीपॅट मशीन व इतर साधनांची तंतोतंत जुळणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने कंबर कसली आहे. व्हीव्हीपॅट मशीन संदर्भात निवडणूक विभागाने वेळोवेळी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले आहे. लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी निवडणूक कार्यालयाने विविध उपाययोजना केल्या आहेत. निवडणूक कार्यालयाने खबरादारीचा उपाय म्हणून राखीव कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने नेमणूक केलेली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.