शस्त्रक्रियेनंतर चार वर्षाच्या बालकाचा मृत्यू

कोपरगावातील प्रकार  :  संतप्त नातेवाईकांकडून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

आत्मा मालिकच्या वलयाचा हॉस्पिटलकडून गैरफायदा

मोठमोठाल्या शस्त्रक्रियांसाठी सरकारी योजनांचा लाभ उठविणे, या दृष्टिकोनातून नामांकित व गुडविल प्राप्त हॉस्पिटल करार बेसिसवर चालविण्यास घेऊन त्याद्वारे आपले उखळ पांढरे करण्याचा एक मोठा व्यवसाय सध्या सर्वत्र सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोपरगाव येथे आत्मा मालिक संचालितद्वारा एव्हरहेल्दी हॉस्पिटल ही संस्था कार्यरत आहे. अनेक घटना घडूनही केवळ आत्मा मालिक संस्थेच्या वलयाचा फायदा या संस्थेला आजपर्यंत मिळाला असल्याची चर्चा सध्या या परिसरात सुरू आहे.

कोपरगाव  – येथील आत्मा मालिक रुग्णालय चालविण्यास घेतलेल्या एव्हरहेल्दी हॉस्पिटलमध्ये एका चार वर्षांच्या बालकावर हृदयाचे छिद्र बंद करण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या या बालकाच्या नातेवाईकांनी रुग्णालयास घेराव घालून संबंधित डॉक्‍टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याबाबत डॉक्‍टरांनी शस्त्रक्रियेविषयी आपल्याला काहीच माहिती दिली नसल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला, तर शस्त्रक्रियेपूर्वी आपण नातेवाईकांना सर्व माहिती दिल्याचा दावा डॉक्‍टरांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्‍यातील बिपखेडा येथील नानासाहेब जाधव यांचा मुलगा रोशन याच्या हृदयाला छिद्र असल्याने त्याला कोपरगाव तालुक्‍यातील कोकणठाण येथील आत्मा मालिक रुग्णालय चालविण्यास घेतलेल्या एव्हरहेल्दी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. येथील डॉक्‍टरांनी त्याची तपासणी करून सोमवारी (दि. 25) दाखल केले होते. रोशनवर हृदयाचे छिद्र बंद करण्याची शस्त्रक्रिया शुक्रवारी (दि.29) रात्री साडेआठला शस्त्रक्रिया कक्षामध्ये नेण्यात आले. त्यानंतर तेथे साधारण सात ते आठ तास शस्त्रक्रिया सुरू होती. शस्त्रक्रिया झाल्यानंतर रोशन याचा काही वेळाने मृत्यू झाला. ही बाब संबंधित डॉक्‍टरांनी नातेवाईकांना कळविली, अशी माहिती रोशन याचे राहाता येथील नातेवाईक कचरू महाले यांनी पत्रकारांना दिली.

याबाबत अधिक माहिती देताना कचरू महाले म्हणाले, सोशल मीडियावर रुग्णालयाची जाहिरात पाहून रोशन याला आत्मा मालिक यांच्याकडून चालविण्यास घेतलेल्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले होते. शुक्रवारी रोशन यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान प्रकृती अत्यवस्थ होऊन त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाइकांनी रुग्णालयात घेराव घालून रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत संबंधित डॉक्‍टर जबाबदार असल्याचा आरोप केला. नातेवाइकांचा गोंधळ सुरू असताना, घटनास्थळी पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्यासह पोलीस दाखल झाले. त्यांनी नातेवाईकांना शांत राहण्याचे आवाहन केले. तुमची काही तक्रार असेल, तर ती तुम्ही पोलिस ठाण्यात नोंदवावा.

आम्ही कारवाई करू, असे सांगितल्यावर परिस्थिती नियंत्रणात आणली. याबाबत मयत रोशन यांचे वडील नानासाहेब जाधव म्हणाले, फॉर्मवर सह्या करा अगदी मोफत शस्त्रक्रिया करू, असे आम्हाला सांगितले होते. त्यामुळे आम्ही त्यासाठी सहमती दर्शवली होती. यासंदर्भात संबंधित डॉक्‍टरांशी संपर्क साधला असता, त्यांनी आपण रोशन याच्या नातेवाईकांना सर्व कल्पना दिली होती, असे सांगितले. मात्र आपल्या मुलाचा मृत्यू डॉक्‍टरांच्या हलगर्जीमुळे झाल्याचा आरोप वडील नानासाहेब यांनी केला.

हॉस्पिटलचे फुटेज तपासून, दोषींवर कारवाईची मागणी यावेळी कुटुंबीयांनी केली. याबाबत पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सदर प्रकरणी रोशन याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठवून दिला आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, घाटी रुग्णालयाकडून शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येईल, त्याचप्रमाणे सदर प्रकरणी डॉक्‍टरांबाबत नातेवाईकांचा काही आक्षेप असल्यास त्याचीही तक्रार नोंदवून घेण्यात येईल असेही पोलीस निरीक्षक माणगावकर यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.