नगर: मेव्हणीच्या मुलीच्या लग्नाला कलवरी म्हणून जाण्यास पत्नीस विरोध केल्याच्या रागातून पत्नीसह चौघांनी पतीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. मारहाणीत हा युवक जखमी झाला आहे. बॉईज हायस्कूलच्या मैदानात ही घटना घडली.
याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात आकाश राजू लोखंडे, प्रकाश राजू लोखंडे, माया राजू लोखंडे (सर्व रा. कोठला, घासगल्ली, नगर) व लक्ष्मी राजू शिंदे (रा. वैदुवाडी, नगर) यांच्याविरुद्ध मारहाण करून दुखापत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजु शिंदे हे पत्नी लक्ष्मी हिला मेव्हणीच्या मुलीच्या लग्नाला कलवरी म्हणून जाऊ नको, असे म्हणाले.
त्यामुळे रागावलेल्या पत्नीसह इतरांनी राजू शिंदे यांना लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी डोके, पाय व पाठीवर बेदम मारहाण केली. या मारहाणीत राजू शिंदे जखमी झाली आहेत.
याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात राजू लक्ष्मण शिंदे (रा.वैदुवाडी, हनुमान मंदिराजवळ, सावेडी, मूळ रा. नारायणडोह, ता. नगर) यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार साबळे हे करीत आहेत.