“चारचाकी गाड्या चालवणाऱ्यांना पेट्रोलची गरज बाकी ९५ टक्के भारतीयांना पेट्रोलची गरज नाही”; भाजप नेत्याचा विचित्र दावा

नवी दिल्ली : आसाम भाजपाचे अध्यक्ष भाबेश कालिता यांनी पेट्रोलच्या दरांसंदर्भातील  वक्तव्याची चर्चा सुरु असतानाच आता पुन्हा एकदा भाजपाच्या आणखीन एका नेत्याने पेट्रोल दरवाढीसंदर्भात विचित्र तर्क लावला आहे.  भारतामध्ये चारचाकी गाड्या चालवणाऱ्या मोजक्या लोकांना पेट्रोलची गरज असते. ९५ टक्के भारतीयांना पेट्रोलची गरज नाहीय, असे विचित्र  विधान उत्तर प्रदेशमधील मंत्री आणि भाजपाचे नेते उपेंद्र तिवारी यांनी केले आहे.

गुरुवारी इंधनाचे दर सलग दुसऱ्यांदा वाढल्यानंतर त्याच दिवशी प्रसारमाध्यमांशी बोलताना तिवारी यांनी या अजब दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जालाऊन शहरामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत असताना तिवारी यांनी इंधनदरवाढीवरुन विरोधकांवरच टीका केली. विरोधकांकडे सरकारवर टीका करण्यासाठी काही मुद्दा नाहीय म्हणून ते इंधनदरवाढीबद्दल बोलत असल्याची टीका तिवारी यांनी केली.


“सरकारने करोनाच्या लसी आणि करोनावरील उपचार मोफत पुरवले आहेत. इंधनाचे दर वाढलेले नाहीत. तुम्ही जर दरडोई उत्पन्न आणि इंधनाच्या दरांमध्ये झालेली वाढ याची तुलना केली तर इंधनाचे दर फार कमी आहेत,” असा युक्तीवाद तिवारी यांनी केला.

उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असणाऱ्या तिवारी यांनी योगी आदित्यनाथ हे राज्यात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशात सत्तेत आल्यापासून दरडोई उत्पन्नामध्ये दुप्पटीने वाढ झाल्याचा दावा केला आहे. मात्र तिवारी यांनी केलेला हा दावा चुकीचा आहे. वर्ल्ड बँकच्या आकडेवारीनुसार मोदी २०१४ साली सत्तेत आले तेव्हा भारतामधील दरडोई उत्पन्न हे १ लाख १६ हजारांच्या आसपास होतं. २०२० मध्ये हा आकडा १ लाख ४२ हजारांच्या आसपास गेला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.