बारामतीतील चार गावांना दर चौथ्या दिवशी पाणी

मेखळी, सोनगाव, डोर्लेवाडीचा समावेश : बागायती भागातही टंचाईच्या झळा तीव्र

डोर्लेवाडी – बारामतीच्या जिरायती भागाबरोबरच बागायती भागाला सुद्धा सातत्याने कमी होत आहे. त्यातच मान्सून पावसाचे आगमन लांबल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या उद्‌भवू लागली आहे. उपलब्ध पाणीसाठा असलेल्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी मेखळी-सोनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत असलेल्या चार गावांच्या पाणी पुरवठ्यात आता कपात करण्यात आली आहे. आता प्रत्येक गावाला दिवसाआड म्हणजे एका गावाला चार दिवसानंतर एकदा पाणी मिळणार असल्याने नागरिकांनी पिण्याचे पाणी जपून काटकसरीने वापरण्याचे आवाहन पाणीपुरवठा समितीनेकडून करण्यात आले आहे.

झारगडवाडी (ता. बारामती) येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून मेखळी, सोनगाव, झारगडवाडी, डोर्लेवाडी या चार गावांना पाणीपुरवठा केला जातो. वीर धरणातील अत्यल्प असलेल्या पाणी साठ्यामुळे लाभक्षेत्रातील गावामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यापुढे पिण्याच्या पाण्यासाठी जरी नीरा डावा कालव्यातून आवर्तन सुटले तरी पुरेसे पाणी मिळेल याची खात्री नसल्याने दमदार पाऊस होईपर्यंत उपलब्ध असलेले पाणी पुरवण्याचे आव्हान समितीपुढे आहे. त्यामुळे पाणी कपातीबाबत निर्णय घेण्यासाठी बुधवारी (दि. 19) संयुक्त समितीची तातडीची बैठक बोलविण्यात आली होती. यामध्ये सध्याचा शिल्लक पाणीसाठा व आवर्तन सुटण्यास किती दिवस बाकी आहेत. याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार पुढील आवर्तन सुटेपर्यंत पाणीपुरवठ्यामध्ये कपात करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. चारही गावातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्याशी चर्चा करून प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती समितीचे सचिव सुनिल माने यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.