करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय
पुणे – शहरालगतच्या गावांमध्ये करोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, हवेली तालुक्यातील मांजरी बु, कदमवाक वस्ती, नऱ्हे आणि वाघोली येथील सर्व शासकीय अधिकारी-कर्मचारी, व्यावसायिक, मजूर, कामगार आणि नागरिकांना येत्या शनिवारपासून (दि.6) ते दि. 12 जूनपर्यंत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात ये-जा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवरकर यांनी हे आदेश दिले आहेत.
हवेली तालुक्यातील ग्रामीण भागातील करोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी त्यावर उपाययोजना करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणेची बैठक नुकतीच झाली. या बैठकीस पोलीस उपविभागीय अधिकारी, हवेली तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक, आरोग्य अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये सर्वानुमते करोनाचे रुग्ण आढळलेल्या गावांमधील नागरिकांच्या हालचालीवर व पुणे व पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीतील शासकीय कार्यालये, खासगी कंपनी अथवा व्यावसायाकरिता ये-जा करत असणाऱ्या नागरिकांवर सुध्दा काही प्रमाणात बंधणे घालणे आवश्यक असल्याचे म्हणणे मांडण्यात आले.
या चार गावांतील ग्रामस्थ, शासकीय आणि खासगी कंपन्यांचे अधिकारी-कर्मचारी हे कामासाठी सद्यस्थितीत गावाबाहेर ये-जा करत आहेत. त्यामुळे करोना विषाणू संसर्ग वाढण्याची शक्यता भीती आहे. या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी किंवा स्वत:च्या घरी सात दिवस रहावे. कामाच्या ठिकाणीच राहून काम करावे किंवा घरी विलगीकरण करून काम करावे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.