जागतिक आरोग्य संघटनेने बोलावली बैठक
बिजींग : चीनमध्ये काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेल्या कोरोनाव्हायरस या नव्या आजाराने आतापर्यंत चौघांचा बळी घेतला आहे. विषाणूजन्य या आजाराने चौथा बळी घेतल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनेही हा विषय गंभीरपणे घेतला असून, हा आजार आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे जाहीर केले जावे का, हे निश्चित करण्यासाठी बुधवारी एक बैठक बोलावली आहे.
कोरोनाव्हायरस हा फ्लूसारखीच लक्षणे असणारा आजार आहे. या आजाराने एकट्या चीनमध्ये चार जणांचा बळी गेला. चीनमध्ये विविध प्रांतांमध्ये राहणाऱ्या काही नागरिकांना याची लागण झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. बीजिंग, शांघाय आणि इतर प्रांतांमध्ये 220 पेक्षा अधिक जणांना याची लागण झाली आहे. त्याचबरोबर चीन व्यतिरिक्त इतर देशांमध्ये 220 रुग्णांना याची लागण झाली. ऑस्ट्रेलियामध्येही एकाला या आजाराची लागण झाली आहे. जपानमध्ये एक तर थायलंडमध्ये दोघांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचे दिसून आले. हॉंगकॉंगमध्ये 106 संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
चीनमधील वुहान प्रांतामध्ये सर्वात आधी कोरोनाव्हायरसचा रुग्ण आढळला होता. या आजारामुळे फुफ्फुसाला जंतूसंसर्ग होतो आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागतो. या रुग्णांवर रुग्णालयातच उपचार केले जातात. चीनमधील कॅलेंडरप्रमाणे तिथे नववर्ष सुरू होते आहे. त्यानिमित्त सुट्ट्या असल्यामुळे अनेक नागरिक चीनमधून बाहेर जाणार आहेत. त्याचवेळी हा आजार पुढे आल्याने इतर देशांसाठी चिंतेची स्थिती आहे.