डाळींब यार्डातील चार व्यापाऱ्यांना सुमारे 30 कोटींचा दंड

शेतकरी पट्टीतून दोन वर्षांत साडेबारा कोटींची लूट : बाजार समितीच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई

पुणे: अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या मार्केटयार्डातील डाळींब यार्डामधील 4 व्यापाऱ्यांना शेतकरी पट्टीतून हमाली, भराई, तोलाई आणि खरेदीदारांकडून नियमापेक्षा अधिकचा लेव्ही कापल्याचे स्पष्ट झाले आहे. या आडत्यांनी 2 वर्षांत 12 कोटी 22 लाख 13 हजारांची लूट केली आहे. त्यात बाजार समितीच्या शुल्काचाही समावेश आहे.

या फसवणुकीबाबत बाजार समितीने संबंधित आडत्यांना लुटीच्या रक्‍कमेसह दीड पट दंडाची रक्‍कम म्हणजेच 30 कोटी 55 लाख 33 हजार रुपये भरण्याची नोटीस दिली आहे. त्यांनी नियमापेक्षा अधिक कापलेली रक्‍कम आणि दंडाची रक्‍कम न भरल्यास त्यांच्याकडून सक्‍तीची वसुली केली जाणार आहे, अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी गुरुवारी दिली. दरम्यान बाजार समितीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

देशमुख म्हणाले, के. डी. चौधरी, मे. सिद्धारूढ फ्रुट एजन्सी, मे. दिलीप बाळकृष्ण डुंबरे, मे. भास्कर नागनाथ लवटे या चार आडत्यांचे दप्तर तपासणीसाठी ताब्यात घेतले होते.

1 एप्रिल 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीतल्या पट्ट्या सनदी लेखपालांकडून तपासण्यात आल्या. त्यात चार आडत्यांनी हमाली, भराई, तोलाई नियमापेक्षा अधिक कापली आहे. खरेदीदारांकडून लेव्ही रक्‍कम अधिक घेतली आहे. तसेच, बाजार समिती शुल्क, देखरेख शुल्क कमी भरल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.