चौपट वेतनाची “स्मार्ट’ खिरापत

“त्या’ अधिकाऱ्यांना अखेर घरचा रस्ता ः महिनाभरात नवीन नियुक्ती प्रक्रिया
 
पुणे – केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे स्मार्ट सिटी कंपनीकडून येत्या महिनाभरात कंपनी सेक्रेटरी आणि चीफ नॉलेज ऑफिसर नेमण्यासाठी जाहिरात काढणार असल्याची माहिती शनिवारी कंपनीच्या संचालक मंडळ बैठकीत देण्यात आली. त्यामुळे मागील सुमारे चार वर्षांपासून तिप्पट ते चौपट वेतनावर या पदांवरील अधिकाऱ्यांना या महिन्यातच घरी जावे लागणार आहे.

पुणे स्मार्ट सिटी कंपनीने कंपनी सेक्रेटरी आणि चीफ नॉलेज ऑफिसरचे दरमहा वेतन हे नागपूर, ठाणे, नाशिक, तसेच कर्नाटकातील काही शहरातील स्मार्ट सिटी पेक्षा चौपट अर्थात दरमहा 2 लाख 57 हजार रुपये, तर चीफ नॉलेज ऑफिसरचे दरमहा वेतन तब्बल 3 लाख 21 हजार रुपये आहे. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीने ही दोन्ही पदे रिक्त ठेवली आहेत. नागपूर स्मार्ट सिटी कंपनीने नुकतेच जानेवारीत कंपनी सेक्रेटरीची नियुक्ती केली असून ते 75 हजार रुपये वेतन देतात. तर चीफ नॉलेज ऑफिसरला 90 हजार रुपये वेतन आहे.

ठाणे स्मार्ट सिटी कंपनी महापालिकेच्याच पॅनेलवरील कंपनी सेक्रेटरीला कामानुसार मानधन देते, तर नॉलेज ऑफिसरला 75 हजार रुपये वेतन देते. नाशिक स्मार्ट कंपनी ही कंपनी सेक्रेटरीला 55 हजार वेतन देते तर नॉलेज ऑफिसरला दीड लाख रुपये देते. कर्नाटकमधील सहा शहरातील स्मार्ट सिटी कंपन्या सेक्रेटरीला दरमहा 60 हजार याप्रमाणे एकसारखेच वेतन देत आहे.

कंपनी संचालकांच्या बैठकीमध्ये शनिवारी काही संचालकांनी यासंदर्भात विषय उपस्थित केला. त्यावर कंपनीच्या विद्यमान कंपनी सेक्रेटरी आणि चीफ नॉलेज ऑफिसर यांना मुदतवाढ देण्यासाठी प्रस्ताव तयार असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. या दोन्ही पदावरील अधिकाऱ्यांचा करार पुढील महिन्यात संपुष्टात येत आहे. शनिवारी झालेल्या बैठकीत वाहतूक नियोजनासाठीच्या “ऍडप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम’ प्रकल्पासाठी शॉर्ट लिस्ट केलेल्या निविदा धारकामार्फत “प्रूफ ऑफ कन्सेप्ट’ करून मूल्यांकनासाठी आयआयटी मुंबईची थर्ड पार्टी म्हणून निवड केली.
तसेच सी-डॅक संस्थेलाही यामध्ये सहभागी करण्याचे निर्देश देण्यात आले. औंध, बाणेर, बालेवाडी या परिसरात चोवीस तास पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाइपलाइन आणि मीटर बसवण्यासाठी महापालिकेला टप्प्याटप्प्याने 165 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.

इतका पगार दिला कोणी?
दोन्ही पदे नव्याने भरण्यासाठी नियमानुसार जाहिरात देण्यात येणार आहे. नव्याने नियुक्त करण्यात येणाऱ्या कंपनी सेक्रेटरी आणि चीफ नॉलेज ऑफिसरला केंद्र सरकारच्या नियमानुसार 75 हजार ते दीड लाख रुपये पगार देण्यात येईल, असेही कंपनीतर्फे नमूद करण्यात आले. मात्र, पूर्वीच्या अधिकाऱ्यांना एवढा पगार कोणी आणि का दिला, याविषयी चकार शब्दही स्मार्टसिटी प्रमुखांनी काढला नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.