चार हजार पोलिसांचा बंदोबस्त

राज्य राखीव दलाच्या तुकड्या राहणार तैनात

असा आहे पोलिस बंदोबस्त

पोलिस अधीक्षक : 1, पोलिस उपअधीक्षक : 7 पोलिस कर्मचारी : 2500, होमगार्ड : 1000, पोलिस निरीक्षक : 15, पोलिस उपनिरीक्षक : 85, राज्य राखीव दल : 3 तुकड्या, निमलष्करी दल : 1 तुकडी.

नगर – नगर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राज्य राखीव दलाच्या तुकड्या, निमलष्करी दलाच्या तुकड्यांसह पोलिस अधिकारी व कर्मचारी असा सुमारे चार हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. बंदोबस्तासाठी तब्बल बाराशे पोलिसांची कुमक बाहेरच्या जिल्ह्यातून नगरला आली आहे. मतदान केंद्रावरील बंदोबस्ताबरोबर मतदारसंघात पोलिसांची गस्त राहणार आहे.

नगर लोकसभा मतदारसंघातील 2 हजार 19 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एका पोलिस कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. एका इमारतीमध्ये चारपेक्षा जास्त मतदान केंद्रे असल्यास वेगळा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. लोकसंख्या जास्त असलेल्या गावांमध्ये मतदान केंद्राबाहेर शंभर मीटर परिसरात दोन पोलिस कर्मचारी व केंद्रामध्ये एक पोलिस कर्मचारी असा पोलिस बंदोबस्त राहणार आहे. संवेदनशील असलेल्या मतदान केंद्रांवर राज्य राखीव दलाचे जवान, निमलष्करी दलाचे जवान नियुक्त करण्यात आले आहेत.

पोलिस अधीक्षक इशू सिंधू यांच्या नेतृत्वाखाली तब्बल चार हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. त्यात सात पोलिस उपअधीक्षक, शंभर अधिकारी, अडीच हजार पोलिस कर्मचारी, एक हजार होमगार्ड बंदोबस्ताला असणार आहेत. पोलिसांबरोबर राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. एका तुकडीमध्ये 90 जवान आहेत. तर सेंट्रल आर्म फोर्सची एक तुकडी नगरला राहणार आहे. विधानसभा मतदारसंघानिहाय पोलिस बंदोबस्त असणार असल्याने एका विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी एका पोलिस उपअधीक्षकावर टाकण्यात आली आहे. आहे. सहा विधानसभा मतदारसंघात सहा पोलिस उपअधीक्षक व नियंत्रण कक्षात एक असे सात पोलिस उपनिरीक्षकांची नियुक्ती बंदोबस्ताला आहे. याचबरोबर वीस टक्के पोलिस कर्मचारी राखीव म्हणून ठेवण्यात आलेले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.