श्रीनगर -जम्मू-काश्मीरमध्ये शुक्रवारी झालेल्या दोन चकमकींत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्या चकमकी शोपियॉं आणि किश्तवाड जिल्ह्यांत झडल्या. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांत विशेष पोलीस अधिकाऱ्याच्या (एसपीओ) हत्येत सामील असणाऱ्या दोघांचा समावेश आहे.
दक्षिण काश्मीरच्या शोपियॉं जिल्ह्यात दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्याआधारे सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांच्या शोधासाठी विशेष मोहीम हाती घेतली.
त्या मोहिमेवेळी जवानांना पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यात दोन दहशतवादी मारले गेले. त्यांची ओळख तातडीने पटू शकली नाही. दरम्यान, किश्तवाड जिल्ह्यात चालू वर्षी पहिल्या दहशतवादी हल्ल्याची नोंद झाली. सोमवारी घडलेल्या त्या घटनेत दोन दहशतवाद्यांनी दोन एसपीओंवर कुऱ्हाडींनी हल्ला केला. त्या हल्ल्यात एक एसपीओ शहीद झाला, तर दुसरा जखमी झाला.
त्यांच्याकडील रायफली घेऊन दहशतवाद्यांनी जंगलात पलायन केले. तेव्हापासून सुरक्षा जवान त्यांच्या मागावर होते. अखेर त्या दहशतवाद्यांना गाठण्यात जवानांना यश आले. त्यानंतर झालेल्या चकमकीत जवानांनी दोन्ही दहशतवाद्यांना ठार केले. एकाच दिवशी चार दहशतवाद्यांचा खात्मा हे सुरक्षा दलांचे मोठे यश मानले जात आहे.