चार तालुक्‍यांवर भीषण जलसंकट!

सप्टेंबर संपतोय, तरीही अजून 50 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

पुणे – जिल्ह्यात अजूनही 50 टॅंकरद्वारे बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर तालुक्‍यातील गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी झालेला जोरदार पाऊस बारामती आणि पुरंदर भागात झाला; परंतु टंचाई दूर होईल, अशी कृपादृष्टी अद्याप पावसाने केलेली नाही.

गतवर्षी परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाईचे मोठे संकट होते. जून अखेरपर्यंत जिल्ह्यात तब्बल साडेतीनशेहून अधिक टॅंकरद्वारे लाखो नागरिकांची तहान भागविली जात होती. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली आणि टॅंकरची संख्या घटली. त्यामुळे 8 तालुके टॅंकरमुक्त झाले. मावळ तालुक्‍यात टॅंकर सुरू करण्याची वेळ आली नाही. तर आठ दिवसांपूर्वी बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर तालुक्‍यांत 42 टॅंकरद्वारे 37 गावे आणि 255 वाड्या वस्त्यांवरील साधारण 83 हजार नागरिकांना पाणीपुरवठा सुरू होता.

परंतू, या तालुक्‍यांमध्ये अजूनही पाऊस झाला नाही, तलावही कोरडेच आहेत. त्यामुळे वस्ती भागावारील गावांची पुन्हा पायपीट सुरू झाली. अशा परिस्थितीत आमच्या गावातील टॅंकर सुरू करण्याची मागणी होत आहे. त्यामध्ये तीन गावे आणि 41 वाड्यावस्त्यांवरील 17 हजार जणांसाठी पुरंदरमध्ये 5 तर बारामतीमध्ये 3 टॅंकर वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे पुरंदरमध्ये टॅंकरची एकूण संख्या 11, बारामतीमध्ये 15 तसेच आंबेगावमध्ये 1, इंदापूरमध्ये 14 आणि दौंड येथे 9 असे एकूण 50 टॅंकर सुरू झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.