मुंबई – राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणे हा मोठा सन्मान आहे. सोमैया विद्याविहारमधील चार विद्यार्थी 36 व्या राष्ट्रीय कनिष्ठ ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी सज्ज आहेत.
या विद्यार्थ्यांनी गेल्या महिन्यात राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेल्या राज्यस्तरीय पात्रता स्पर्धांमध्ये आपापल्या क्रीडाप्रकारामध्ये सहभाग घेतला आणि विजय मिळवला. राष्ट्रीय स्पर्धा 6 ते 10 फेब्रुवारीदरम्यान आसाममधील गुवाहाटी येथे होणार आहेत.
या स्पर्धांमध्ये 24 राज्यांतील क्रीडापटू सहभागी होणार असल्याचे समजते. महाराष्ट्रातून विविध वयोगटातील 87 स्पर्धक सहभागी होणार आहेत. या विद्यार्थ्यांना सोमैया स्पोर्टस् अकादमीच्या प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली प्रशिक्षण दिले जात आहे.
क्रीडापटूंना प्रशिक्षण देण्यासोबतच अकादमी त्यांच्या सातत्यपूर्ण विकासाची, स्पर्धांसाठी त्यांना प्रवास भत्ते पुरवण्याची जबाबदारी घेते. त्याचप्रमाणे त्यांना फिटनेस ट्रेनर्स, व्यायामशाळेची सुविधा, कामगिरी सुधारण्यासाठी आवश्यक उपकरणे, तांत्रिक तसेच व्यूहरचनात्मक विकासासाठी प्रशिक्षक आणि आवश्यक त्या अन्य सर्व सुविधाही पुरवते.