पिंपरी- निर्जन ठिकाणी पार्क केलेल्या रिक्षा हेरून बनावट चावीच्या सहाय्याने रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला गुन्हे शाखा युनिट दोनने अटक केली आहे. त्याच्याकडून चार रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.
गणेश दत्तू सूर्यवंशी (वय 30, रा. ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक पिंपरी चिंचवड शहरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार देवा राऊत यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती चोरीची रिक्षा घेऊन ओटास्कीम निगडी येथे फिरत आहे. त्यानुसार पथकाने निगडी परिसरात सापळा लावला. आपल्या मागावर पोलीस आले असल्याची चाहूल लागतात आरोपी वेगात रिक्षा चालवून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले त्याच्याकडे असलेल्या रिक्षा (एमएच 14/सीयु 0481) बाबत चौकशी केली असता त्याने ती रिक्षा रुपीनगर परिसरातून चोरली असल्याचे सांगितले. त्याच्याकडे आणखी चौकशी केली असता त्याने पिंपरी चिंचवड शहर परिसरातून तसेच कोथरूड येथून एकूण चार रिक्षा चोरी केल्याचे सांगितले.
पोलिसांनी आरोपी गणेश सूर्यवंशी याच्याकडून चार रिक्षा (एमएच 14/सीयु 0481, एमएच 14/एचएम 3017, एमएच 12/एनडब्ल्यू 5363, एमएच 14/जेएस 0535) जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे चिखली, पिंपरी आणि कोथरूड पोलीस ठाण्यातील वाहन चोरीचा प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपी गणेश सूर्यवंशी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी चोरीच्या गुन्ह्याची नोंद आहे. तो हँडल लॉक नसलेल्या, निर्जन स्थळी पार्किंग केलेल्या प्रवासी वाहतुकीच्या रिक्षा बनावट चावीच्या सहाय्याने चोरी करीत होता. चोरीच्या रिक्षा तो अशिक्षित लोकांना विक्री करून पैसे कमावत असे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, केराप्पा माने, पोलीस अंमलदार प्रमोद वेताळ, जयवंत राऊत, देवा राऊत, नामदेव कापसे, अजित सानप यांनी केली./table>