इसिसशी संबंधित चौघांना कोलकात्यात अटक

कोलकाता – कोलकाता पोलिसांनी इसिसशी संबंधित चौघाजणांना दोन वेगवेगळ्या ठिकाणांवरून अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या “स्पेशल टास्क फोर्स’ने “निओ जमातुल मुजाहिदीन बांगलादेश'(जेएमबी) आणि इस्लामिक स्टेट (इसिस) शी संबंधित चौघा हस्तकांना अटक केली, असे पोलिसांनी सांगितले. या गटामध्ये तिघे बांगलादेशी आणि एका भारतीयाचा सहभाग असून ते पश्‍चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील रहिवासी आहेत, असे कोलकात्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

यापैकी दोघाजणांना सोमवारी सियालदाह भागातून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीच्य आधारे आणखी दोघांना हावडा रेल्वे स्टेशनजवळून मंगळवारी सकाळी ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेले तिघे बांगलादेशी नागरिक त्यांच्या देशात अटक होण्याची भीती असल्याने गेल्या काही काळापासून भारतातच रहात होते. या तिघांना भारतीय नागरिकाकडूनच मदत होत होती.

दहशतवादी कारवायांमध्ये नवीन तरुणांची भरती करण्याचे आणि अर्थसहाय्य मिळवण्याचे काम हे चौघे करत होते. त्यांच्या मोबाईल फोनमध्ये जिहादी फोटो, व्हिडीओ, प्रक्षोभक साहित्य होते. हे चौघेही सोशल मिडीयावर विशेष सक्रिय होते, असेही पोलिस अधिकाऱ्यांनी संगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.