पीएमसी बॅंक घेण्यास चार संस्था तयार

ठेवीदारांमध्ये आनंदाचे वातावरण

मुंबई – पंजाब व महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंकेचे अधिग्रहण करण्याची तयारी चार संस्थांनी दर्शविली आहे. त्यामुळे बॅंकेच्या लाखो ठेवीदारांच्या अडचणी संपण्याची शक्‍यता दृष्टिपथात आली आहे. त्यामुळे ठेवीदारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

वित्तीय क्षेत्रातील कंपन्या आणि औद्योगिक संस्था यांनी भागीदारीत अर्ज केले आहेत. या संस्था रिझर्व्ह बॅंकेच्या निकषांत बसणे आवश्‍यक आहे. पीएमसी बॅंकेला छोट्या वित्तीय बॅंकेत रूपांतरित करण्याचा पर्याय संभाव्य खरेदीदारांना उपलब्ध असेल, तथापि, त्यासाठी त्यांना रिझर्व्ह बॅंकेकडून परवाना मिळवावा लागेल. असा परवाना मिळण्यासाठी खरेदीदार संस्था आधी पात्र असावी लागेल. पीएमसी बॅंक ही बहुराज्यीय बॅंक आहे.

नोव्हेंबरमध्ये पीएमसी बॅंकेने आपल्या अधिग्रहणासाठी पात्र संस्थांकडून इरादापत्रे मागितली होती. इरादापत्रे सादर करण्याची मुदत गुरुवारी सायंकाळी संपली. माहीतगार सूत्रांनी सांगितले की, चार संस्थांनी पीएमसी बॅंकेचे अधिग्रहण करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांनी इरादापत्रे सादर केली आहेत. त्यांच्या अर्जांची आता छाननी केली जाईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.