पुणे – पुरंदर विमानतळ उभारणार चार संस्था

पुणे – पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूसंपादन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या “विशेष नियोजन प्राधिकरणा’चा (एसपीव्हीए) विस्तार करण्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार या एसपीव्हीमध्ये सर्वाधिक 51 टक्‍के वाटा हा सिडकोचा असणार आहे. तर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचा 19 टक्‍के आणि पीएमआरडीए व एमआयडीसीचे प्रत्येकी 15 टक्‍के हिस्सा असणार आहे.

पुरंदर तालुक्‍यातील सात गावांमधील 2 हजार 832 हेक्‍टर जागा निश्‍चित केली आहे. यासाठी शासनाने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस (एमएडीसी) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून शासनाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. विमानतळासाठी भूसंपादन करण्यात येणाऱ्या या सात गावांपैकी काही गावांची हद्द ही पीएमआरडीएच्या हद्दीत येतात. तसेच, विमानतळ विकासासाठी काही हजार कोटी रुपये लागणार आहेत. विमानतळ विकसनाचे काम गतीने मार्गी लागावे, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष नियोजन प्राधिकरणाचा विस्तार करण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर मध्यंतरी सुरू होता. एमएडीसीबरोबरच, सिडको आणि पीएमआरडीए यांना या एसपीव्हीएमध्ये स्थान द्यावे. तसेच, या तिन्ही संस्थांच्या माध्यमातून विमानतळ विकसनासाठी बीज भांडवल उभे करावे, असा हेतू त्यामागे असल्याचे सांगण्यात आले होते. केंद्र सरकारकडून मध्यंतरी एव्हिएशन-2018 या नियमांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये देखील या तरतुदीचा समावेश करण्यात आला आहे. त्या आधारे हे विस्तारीकरण करणे शक्‍य होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.