पुणे – महाराष्ट्र शिक्षण सेवा या संवर्गातील वयाची 55 वर्षे पूर्ण करणाऱ्या चार अधिकाऱ्यांना विभागीय परीक्षेतून सूट देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला.
शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना पदोन्नती, वेतनश्रेणी वाढ यासह इतर काही कारणांसाठी विभागीय परीक्षा पास होण्याबाबतच्या अटी घालण्यात येत असतात. मात्र, सेवानिवृत्तीचा कालावधी जवळ आलेल्या अधिकाऱ्यांना या परीक्षा द्याव्या लागाव्यात ही आश्चर्यकारक बाब होती.
शिक्षण सक्षमीकरण शाखेअंतर्गत प्राचार्य रवींद्र आंबेकर, वरिष्ठ अधिव्याख्याता बबन वसेकर, प्रशांत डवरे, अधिव्याख्याता संजीवकुमार खाडे आदी अधिकारी कार्यरत आहेत. शासनाने संबंधित पदांसाठी विभागीय परीक्षांबाबतच्या अधिसूचना 26 फेब्रुवारी 2018 मध्ये प्रसिद्ध केल्या होत्या.
नियमातील तरतूदीनुसार वयोमानानुसार अधिकाऱ्यांना विभागीय परीक्षेतून सूट देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास नुकतीच मान्यता दिली. त्याबाबतचे आदेश शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव दीपक शेलार यांनी दिले आहेत.