बेल्हे : जुन्नर तालुक्यात सोमवारी (दि.१३) वारूळवाडीत १ व औरंगपूर येथील ३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यात एकूण बाधितांची संख्या १४८ झाली असून यामध्ये ७२ रुग्ण हे उपचारादरम्यान बरे झाले आहेत.
सध्या ७३ ऍक्टिव्ह रुग्ण असून ३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी दिली. औरंगपूर (ता.जुन्नर) येथे शनिवार (दि.११) रोजी मुंबईहून आलेल्या तिघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये एक महिला व दोन मुलांचा समावेश आहे.
मुंबईवरून गावी आल्यानंतर ते आपल्या घरी क्वारंटाईन झाले होते. सदर व्यक्तींचे रिपोर्ट आज मुंबईवरून आल्याने तिघांनाही सोमवारी (दि.१३) लेण्याद्री येथील कोविडं सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती निमगाव सावाचे आरोग्य सहाय्यक संभाजी घोडे यांनी दिली.
तालुक्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असतानाही नागरिक सुचनांचे पालन करताना दिसत नाहीत. करोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी नागरिकांनी सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन तहसीलदार कोळेकर यांनी केलं आहे.