एक पोलीस कर्मचारीही झाला शहीद
रायपूर – छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्ह्यात पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले तर एक पोलीस कर्मचारी शहीद झाल्याचा प्रकार घडला आहे. शुक्रवारी रात्री परधौनी गावात ही चकमक झाली. हे गाव रायपूरपासून 150 किमी अंतरावर आहे.
या गावात नक्षलवाद्यांचे वास्तव्य असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या पथकाने या गावाला वेढा दिला त्यावेळी ही चकमक सुरू झाली. त्यात नक्षलवाद्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात पोलीस उपनिरीक्षक एस. के. शर्मा कामी आले. चकमकीच्या स्थळी चार नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले आहेत.
त्यांच्याजवळून एक एके रायफल आणि एक एसएलआर रायफल आणि दोन बंदुका आढळून आल्या असून अन्यही दारूगोळा मिळाला आहे. ठार झालेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेचा नक्षलवाद्यांकडून बदला घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गावात जादा पोलीस दले पाठवण्यात आली आहेत.