पुणे – गेल्या तीन दिवसांपासून शहरात कोसळणाऱ्या पावसाचा जोर आणखी दोन ते तीन दिवस कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मंगळवार आणि बुधवारी रात्री तर विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. ही स्थिती आणखी दोन ते तीन दिवस राहणार आहे. बंगालचा उपसागर व आंध्र प्रदेशाचा दक्षिण भाग ते तमिळनाडूच्या उत्तर भागात असलेल्या चक्राकार स्थितीचा परिणाम राज्यातील हवामानावर झाला आहे. त्यामुळे पुणे मुंबईसह मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला आहे.असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात पुढील पाचही दिवस मुसळधार पाऊस कोसळेल. साधारणतः 51 ते 75 टक्के पावसाची शक्यता आहे. पुण्यात यंदा एक हजार मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. आतापर्यंत शहरात 1018 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे.