चार महिन्यांचे टेन्शन मिटले

धरणांत पाच टीएमसी पाणी : पुणेकरांना दिलासा

कोकणातील पावसाची कृपा…

या चारही धरणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असला, तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्र तसेच कोकणातील पावसामुळे पानशेत आणि वरसगाव धरणाच्या पाणीसाठ्यात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाणीसाठा वाढत आहे. मागील वर्षी याच कालावधीत या चारही धरणांमध्ये 5.52 टीएमसी पाणीसाठा होता. 

पुणे –शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील पाण्याचा साठा शनिवारी सायंकाळी 5 टीएमसीजवळ पोहचला आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेपाच वाजता हा साठा 4.91 टीएमसी झाला होता. तर सायंकाळनंतर या चारही धरणात पुन्हा पावसाला सुरूवात झाली होती. त्यामुळे सर्व बाजूंनी पाण्याची आवक सुरू असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

खडकवासला साखळीतील चारही धरणांच्या क्षेत्रात गेल्या आठवड्यापासून चांगला पाऊस सुरू आहे. त्यामुळे खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चारही धरणांत पाणीसाठा वाढत आहे. त्यातच, पावसामुळे महापालिकेचीही पाण्याची मागणी घटली आहे.

परिणामी धरणात सध्या शहराला पुढील चार महिने पुरेल एवढा पाणीसाठा झाला असून दिवाळीपासून धरणातील पाणी घटल्याने पाणी कपातीचा सामना करणाऱ्या पुणेकरांसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे. शनिवारी सकाळी 6 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत खडकवासला-6, पानशेत-26 मिमी, वरसगाव-27 , तर टेमघर धरणक्षेत्रात 51 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.