सातारा,- शिरवळ येथील शिंदेवाडी परिसरात पिस्टलची विक्री करण्यासाठी आलेल्या संशयिताकडून सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (एलसीबी) ४ पिस्टल व ४ जिवंत काडतुसे जप्त केली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एक संशयित पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
शुभम उर्फ सोनू अनिल शिंदे (वय २४, रा. महर्षीनगर, स्वारगेट पुणे) या संशयित युवकाला अटक केली आहे. त्याचा साथीदार पळून गेला असून त्याने त्या साथीदाराचे नाव पोलिसांना सांगितले आहे. शिंदेवाडी (ता. खंडाळा) येथील राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्त्यानजीकच्या एका कंपनीजवळ देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे विक्री करण्याकरीता काही जण येणार असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन दोघे येत असल्याचे पोलिसांना दिसताच त्यांनी थांबण्यास सांगितले. मात्र, संशयितांनी दुचाकी पळवली. पोलिसांनी पाठलाग करुन दुचाकीवर पाठीमागे बसलेल्याला पकडून ओढले.
पोलिसांनी संशयिताकडे तपासणी केली असता त्याच्याकडे असणाऱ्या सॅकमध्ये ४ पिस्टल व ४ जिवंत काडतुसे निघाली. यामुळे पोलिसांनी हत्यारे जप्त करुन संशयिताला ताब्यात घेतले.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, शिवाजी गुरव, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, निलेश फडतरे, अमित झेंडे, प्रवीण फडतरे, अमित माने, शिवाजी भिसे, अरुण पाटील, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, स्वप्निल कुंभार, ओमकार यादव, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाने, पृथ्वीराज जाधव, संकेत निकम, रविराज वर्णेकर, विजय निकम यांनी या कारवाईत सहभाग घेतला.