अत्यंत खडतर प्रशिक्षणानंतर होत आहे नियुक्ती
पुणे – “विविध लढायांमध्ये साहसी पराक्रम गाजविणाऱ्या मराठा सैन्याची यशाची परंपरा सर्वज्ञात आहे. याच परंपरेला पुढे नेत यंदा राज्यातील 12 तरुण भारतीय सैन्य दलात दाखल होत आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये पुण्यातील चार तरूणांचा समावेश असून लवकरच हे चारही जण लष्करात लेफ्टनंट या पदावर रूजू होणार आहेत.
देशसेवेसाठी सक्षम लष्करी अधिकारी तयार करणाऱ्या इंडियन मिलिटरी ऍकॅडमी म्हणजेच आयएमएचे दीक्षांत संचलन नुकतेच पार पडले. खडतर प्रशिक्षण पूर्ण करून लष्करात दाखल होणाऱ्या 306 जणांपैकी महाराष्ट्रातील 12 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी पुण्यातील ओम बाविस्कर, ऋषिकेश गवारे, ओंकार जगताप आणि तन्मय कुमठेकर यांचा यामध्ये समावेश आहे.
लष्करी अधिकारी होण्यासाठी शैक्षणिक गुवत्तेबरोबरच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यदेखील अतिशय महत्त्वाचे असते. याव्यतिरिक्त प्रबोधिनीमधील खडतर प्रशिक्षणदेखील पूर्ण करणे आवश्यक असते. मात्र, प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांपैकी मोजकेच तरुण या सर्व कसोट्यांवर यशस्वी ठरत लष्करात अधिकारी म्हणून दाखल होतात. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत देहराडून येथे झालेल्या दीक्षांत संचलन सोहळ्यात या दोघांनाही लेफ्टनंट ही रॅंक प्रदान करण्यात आली.
बाविस्कर परिवारातील ओम हा पहिलाच तरुण आहे, की जो भारतीय सेनेत कार्यरत होत आहे. लहानपणापासून पाहत असलेले त्याचे लष्करात जाण्याचे स्वप्न आज पूर्ण होत आहे. ओम याने इयत्ता 8वी ते 12 वीपर्यंतचे शिक्षण राष्ट्रीय इंडियन मिलटरी कॉलेज (ठखचउ) डेहराडून येथे पूर्ण केले आहे. तसेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्या नंतरचे एक वर्षाचे पुढील ट्रेनिंग इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून येथून पूर्ण करून तो लेफ्टनंट होणार आहे. त्याचे हे यश पाहून अत्यंत आनंद होत आहे.
अजय बाविस्कर, ओम यांचे वडील