पुणे – जमिन दुसऱ्याला विकली या कारणावरुन रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन बेदम मारहाण करणाऱ्या चार जणांना न्यायालयाने प्रत्येकी पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजुर केला.
चेतन गुंजाळ, सागर गुंजाळ, संग्राम गुंजाळ, चंद्रकांत गुंजाळ अशी जामीन मंजुर झालेल्यांची नावे आहेत. चौघांनी ऍड. हेमंत झंजाड आणि ऍड. सागर गायकवाड यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. याप्रकरणी संतोष गुंजाळ यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
फियार्दीने स्वत:च्या मालकीची दोन गुंठे जमीन दुसऱ्या व्यक्तीला विकली. त्याचा राग धरून चौघांनी मिळून त्यांच्याकडील रिव्हॉल्वर फिर्यादीच्या डोक्याला लावून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांना गाडीमध्ये बळजबरी बसवून त्यांचे अपहरण करून मारहाण केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. आरोपी आणि फिर्यादी यांचा वाद हा दिवाणी स्वरूपाचा आहे. फिर्यादीने जमीन विकून एक वर्ष झाले आहे. त्यामुळे त्या कारणावरून अपहरण करून मारहाण करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.
तसेच आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली रिव्हॉल्वर, फॉर्च्युनर गाडी आणि स्विफ्ट गाडी जप्त करण्यात आल्याने पोलीस कोठडीची गरज नाही, असा युक्तीवाद ऍड. हेमंत झंजाड यांनी केला. त्यानंतर चौघांना जामीन मंजुर करण्यात आला.