चार पिढ्यांची ओढ आळंदीकडे

36 वर्षांपासून कळस दिंडी सोहळ्याची परंपरा
पाबळ (वार्ताहर) – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर माऊली यांच्या 724 व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी पाबळमार्गे अनेक दिंड्या येत आहेत. कळस (ता. पारनेर) येथील कळस- आळंदी दिंडी सोहळ्यातील वारकरी 36 वर्षांपासून संजीवन समाधी सोहळ्यासाठी येत आहेत. ही परंपरा नगर जिल्ह्यात आदर्शवत ठरली आहे. तब्बल चार पिढ्यांचे एकाच कुटुंबातील सदस्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली आहे.

पाबळ येथे कळस आळंदी दिंडी सोहळ्यातील 250 च्यावर वारकऱ्यांचा ताफा चहा पाण्यासाठी क्षणभर विसावला. त्यावेळी विसावताना त्यांच्याशी संवाद साधला. यात तब्बल ऐंशी वर्षे वयाचे ज्येष्ठ नागरिक होते. बारा वर्षांचा पणतू होता. या दिंडीच्या प्रमुख कळस (ता. पारनेर) येथील असलेल्या सुरेखा गाडगे या माजी सरपंच होत्या. तब्बल 36 वर्षे पायी वारी सुरू असल्याची माहिती सुरेखा गाडगे यांनी यावेळी दिली.

दरम्यान, दिंडी सोहळ्याने विसावा घेतल्यानंतर काही वेळानंतर दिंडीतून पुन्हा भजनाचे सूर घुमू लागले. दिंडीत कळस येथील बॅंकेत नोकरी करत असलेल्या लक्ष्मण गाडगे यांनी वारीच्या आकर्षणाचा महिमा सांगितला. यावेळी त्यांचा ऊर भरून आल्याने ते नि:शब्द झाले. पाबळ येथील जय जलाराम हॉटेल चालकाने दिंडीसाठी चहा- पाण्याची व्यवस्था केली. यावेळी दिंडीच्या माध्यमातून विनायक संभूदास यांचा सत्कार करण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.