सांगली : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील माजी मंत्री -माजी आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटातील नाराज नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आता घरोबा करण्याचा जवळपास निश्चित केला आहे. तशी एक बैठक देखील पार पडली आहे. यामुळे आता अजित पवारांची पश्चिम महाराष्ट्रात ताकद वाढणार आहे.
‘हे’ 4 माजी आमदार करणार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गट भक्कम करण्यासाठी व्यूह रचना सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन अजित पवार पक्ष आणि नाराज असलेल्या जिल्ह्यातील माजी आमदारांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये शिराळाचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजित घोरपडे, माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांचा समावेश आहे.
विलासराव जगताप यांनी भाजपाला रामराम करत लोकसभा आणि विधानसभा निवडणूक भाजपा विरोधात काम केलं. तर माजी मंत्री अजित घोरपडे यांनी विधानसभेला अजित पवार गटाच्या संजयकाका पाटलांना साथ दिली. तर शिराळ्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक पक्षासोबत राहिले होते. तर आटपाडीचे नेते माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी शरद पवार गटात दाखल होऊन अपक्ष म्हणून बंडखोरी करत निवडणूक लढवली होती.
आता हे सगळे नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अजित पवारांशी चर्चा करून या चारही नेत्यांचा पक्षप्रवेश होईल असे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार गटाची ताकद वाढेल तर जयंत पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का असणार आहे.