बुलडाण्यातील भीषण अपघातात चार ठार

बुलडाणा – बुलडाण्याच्या मेहकरजवळ अंजनी खुर्द येथे बोलेरो आणि कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास घडला.

मनोहर क्षीरसागर (70) मेघा क्षीरसागर (35), नलिनी क्षीरसागर (66) आणि चालक सुखदेव नागरे (25) अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, औरंगाबादच्या कन्नड येथील क्षीरसागर कुटुंब मुलासाठी मुलगी पाहायला गेले होते. शनिवारी रात्री नागपूरवरून बोलेरोने औरंगाबादकडे निघाले होते. परत येत असताना हा अपघात झाला. मेहकरकडून येणाऱ्या कंटेनर आणि बोलेरोची समोरासमोर जबर धडक झाली. या अपघातात आई, वडील, मुलगी, व बोलेरो चालवणारा चालक जागीच ठार झाले.

या अपघातात बोलेरो गाडी चक्काचूर झाली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतांचे पार्थिव जवळील सरकारी रुग्णालयात ठेवण्यात आल्याची माहिती असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, याच ठिकाणी 15 एप्रिलला असाच एक मोठा अपघात झाला होता. त्या अपघातात महू येथून येत असताना जुमडे कुटुंबातील पाच जण जागीच ठार झाले होते. हा अपघात स्कॉर्पिओ आणि ट्रकमध्ये झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.