परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची खरेदी वाढली
मुंबई –जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यानंतर मंगळवारी भारतीय शेअरबाजारात निवडक खरेदी वाढली. परकीय संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअरबाजाराकडे वळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे चार दिवसांनंतर शेअरबाजार निर्देशांकांत मोठी वाढ झाली.
मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 748 अंकांनी उसळून 37,687 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 203 अंकांनी म्हणजे 1.87 टक्क्यांनी उसळून 11,095 अंकांवर बंद झाला. यामुळे कंपन्याचे भांडवली मुल्य 2 लाख कोटी रुपयानी वाढले.
आजच्या तेजीचे नेतृत्व रिलायन्स आणि एचडीएफसी बॅंकेने केले. विशेष म्हणजे काल या दोन्ही कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली होती. रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 7.10 टक्क्यांनी वाढला.ही कंपनी फ्युचर समूहातील काही भाग विकत घेणार असल्याचे वृत्त बाजारात पसरल्यामुळे या कंपनीचा शेअर तेजीत होता.
आजच्या कामकाजाचे वैशिष्टय म्हणजे मोठ्या कंपन्याबरोबर छोट्या कंपन्यांच्या शेअरची जोरदार खरेदी झाल्यामुळे मुंबई शेअरबाजाराचा मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक 1.23 टक्क्यांपर्यंत वाढले
– एस.रंगनाथन, संशोधन प्रमुख, एलकेपी सिक्युरिटी.
एचडीएफसी बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी एचडीएफसी बॅंकेत सध्या कार्यरत असलेले शशिधर जगदीशन यांची नियुक्ती होणार आहे. त्यामुळे या बॅंकेचा शेअर चार टक्क्यांनी वाढला. मारुती, ऍक्सिस बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, बजाज फायनान्स या कंपन्यांचे शेअरचे भाव वाढले. परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी काल तब्बल 7,818 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. यामुळे किरकोळ गुंतवणूकदार खरेदीसाठी सरसावले
आज झालेल्या खरेदीचा फायदा ऊर्जा, वित्त, बॅंकिंग, वाहन, आरोग्य, धातू क्षेत्रांतील कंपन्यांना झाला व या क्षेत्रांचे निर्देशांक वाढले. मात्र रुपया कालपासून घसरत असल्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे निर्देशांक कमी झाले.