मदनदादा चारच दिवसात भाजपवासी?

7 किंवा 8 मार्चला मुख्यमंत्री व नितीन गडकरी किसन वीर कारखान्यावर
करुणा पोळ

कवठे – किसन वीर उद्योग समूहाचे अध्यक्ष मदन भोसले हे भाजपात जाणार की कॉंग्रेसमध्येच राहणार? याबाबत लढविल्या जात असलेल्या तर्कवितर्क आता संपण्याची वेळ जवळ आली असून चारच दिवसात मदनदादा यांचा निर्णय जाहीर होण्याची शक्‍यता आहे. याबाबत खात्रीशीर वृत्त त्यांच्या निकटच्या कार्यकर्त्यांच्याकडून सांगितले जात आहे. 1 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मदनदादा यांच्यात सह्याद्री अतिथीगृहात चर्चा झाली होती. या चर्चेबाबत जरी काही माहिती समजली नसली तरी किसन वीर कारखान्याच्या भुईंज येथील युनिटवरील तिसऱ्या डिस्टीलरीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी करावे, अशी गळ मदनदादांनी त्यांना घातल्याचे समजते.

यानुसार 3 किंवा 4 मार्चच्या दरम्यान सदर कार्यक्रम होण्याची शक्‍यता होती. परंतु भारत व पाकिस्तान दरम्यानच्या तणावपूर्ण परिस्थितीने सदर कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. मात्र आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्‍यता असल्याने आचारसंहिता सुरु होण्याच्या अगोदर सदर कार्यक्रम घेवून त्यामध्ये अधिकृत घोषणा होण्याची शक्‍यता निश्‍चित मानली जात असल्याने आता सदर कार्यक्रम 7 किंवा 8 मार्चला होणार आहे, हे मात्र निश्‍चित झाले आहे.

दादांच्या भाजपाप्रवेशाबाबत त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली असता बहुतांश कार्यकर्त्यांनी सारासार विचार करता दादांनी भाजपात जावे असा कौल दिला आहे. याबाबत काही कार्यकर्त्यांच्या सांगितले कि गतवर्षी ज्यावेळी कारखाना अडचणीत होता त्यावेळी सद्यस्थितीत असलेल्या मित्रपक्षातील काहींनी कारखान्यासमोरच्या अडचणी वाढविण्याचाच प्रयत्न केला. जिथून जिथून मदत घेण्याचा प्रयत्न झाला तिथून ती मदत देऊ नये याबाबत विरोधकांनी कसोशीने प्रयत्न केल्याने गतवर्षी शेतकऱ्यांना एफ.आर.पी. देण्यास अडथळा आला व त्यामुळे दादांसह सर्वच अडचणीत आले होते. यंदा कारखान्याचे धुराडेसुद्धा पेटणार नाही अशी वल्गना केली जात असताना तिन्ही कारखान्यांची धुराडी पेटलीसुद्धा व एफ. आर. पी, प्रमाणे बिलाचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमासुद्धा झाले.

यासाठी मुख्यमंत्र्यांचे सहकार्य लाभले असून किसन वीर कारखान्याला अडचणीच्या वेळेत मदत केल्याने त्यांच्यासोबत जाण्यास काहीही हरकत नाही असा सुरु कार्यकर्त्यांचा आहे.मात्र काही कार्यकर्ते असेही म्हणतात की पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी कारखान्याला मदत केलीच की! त्यामुळे दादांनी कॉंग्रेसमध्येच रहावे.सातारा कॉंग्रेसच्या जडणघडणीमध्ये मदनदादा व त्यांच्या घराण्याचे मोठे योगदान आहे. माजी प्रदेशाध्यक्षपद, खासदार, आमदार, जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्षपद या घराणे कॉंग्रेसच्या माध्यमातून भूषविले असून ज्यावेळी जिल्हा राष्ट्रवादीच्या ताब्यात गेला व राज्यात ज्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार होते व एकटे विलासराव पाटील उंडाळकर हे एकमेव कॉंग्रेसचे आमदार होते त्या कालावधीत सातारा जिल्ह्याच्या कॉंग्रेसची पडझड चालू असताना निवडणुकीच्या माध्यमातून जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्षपद मदनदादांनी भूषविले होते व जिल्हा कॉंग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

सद्यस्थितीत मदनदादांनी मौन पाळले असून ते अजूनसुद्धा कॉंग्रेसमध्येच आहेत. त्यांनी याबाबत कोणतेही स्टेटमेंट दिले नसताना लोणंद येथील कॉंग्रेसच्या मेळाव्यात स्वत: पृथ्वीराज बाबांनी मदनदादांच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त कधी? अशी टीका केल्याने ती टीका मदन भोसले यांच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली आहे. वास्तविकत: खंडाळा कारखान्यावरील कार्यक्रम हा कारखाना समूह आर्थिक अडचणीत आल्याने अडचणी सोडविण्यासाठी घेतला असून या कार्यक्रमाचे निमंत्रण मदनदादा भोसले यांनी स्वत: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व आमदार जयकुमार गोरे यांना दिले होते व बाबा आपण या कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्वीकारा अशी गळ प्रत्यक्ष भेट घेवून घातली होती.

या कार्यक्रमास येण्याचे कॉंग्रेसच्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांनी टाळले ही बाब जरी पक्षीय पातळीवर ग्राह्य धरली तरीसुद्धा कार्यक्रम झाल्यानंतर प्रत्यक्षरीत्या मदनदादांनी अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केली नसल्याने त्यांची भेट घेवून आपण कॉंग्रेसमध्येच रहावे अशी अटकळ जिल्ह्यातील कोणत्याही वरिष्ठ कॉंग्रेस नेत्याने केली नाही. याउलट दादा आपण कार्यकर्त्यांचे म्हणणे लक्षात घेवून भाजपात यावे असे जाहीर आवाहन मुख्यमंत्र्यांनी केल्याने जिल्ह्यातील कॉंग्रेसलाच मदनदादा नको आहेत काय? असा सवाल मदनदादांचे कार्यकर्ते करीत आहेत.

खंडाळा कारखान्यावरील कार्यक्रमाच्यावेळी उपस्थित असलेला प्रचंड जनसमुदाय ही मदनदादांच्या कार्याची पोहोचपावती असून स्वतः मुख्यमंत्र्याच्यासह पाच मंत्र्यांनी हा जनसमुदाय पहिल्याने भाजपाला मदनदादांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. याउलट वेळे येथील कारखाना संचालक प्रताप यादव यांच्या फार्म हाउसवर झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मदनदादा भोसले यांच्या कन्येने त्यांच्या घरात असलेली कॉंग्रेसबद्दलची भूमिका मांडली आणि स्वतःच्या वैयक्तिक भावना आपल्या वक्तव्यात मांडल्या असता कॉंग्रेसप्रेमी मदनदादांच्या डोळ्यात पाणी आले होते. काही कार्यकर्त्यांच्या मनात दादांनी मागील पंचवार्षिकलाच भाजपात प्रवेश केला असता तर चित्र वेगळे दिसले असते अशी भूमिका मांडल्याने मदन भोसले यांच्यावरसुद्धा सद्यस्थितीत कार्यकर्त्यांचा दबाव वाढत असून त्यांच्या भाजपा प्रवेशाबाबतच्या सर्व चर्चेला पूर्णविराम दिनांक 7 किंवा 8 मार्च रोजीच्या कार्यक्रमातच मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.