नगर – एमआयडीसीतील हत्त्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून त्याला आज न्यायालयात हजर केले असता त्याला 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. एमआयडीसी मधील क्रॉम्प्टन कंपनीत दोन दिवसापूर्वी सुपरवायझर राजाभाऊ वाघमारे व सिक्युरिटी गार्ड किरण लोमटे यांच्यात ड्यूटीवरून वाद झाला.
लोमटे याला याचा राग आल्याने कोयत्याने सपासप वार करून वाघमारे यांची हत्या करून आरोपी पसार झाला होता. याबाबत पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत शुक्रवारी आरोपीला ताब्यात घेतले. शनिवार (दि.25) रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत माहिती अशी की, कंपनीचे सिक्युरिटीचे कामकाज एका खाजगी ठेकेदाराकडे आहे. कंपनीच्या सिक्युरिटीसाठी काम तीन शिफ्टमध्ये चालते. एका शिफ्टसाठी सहा सिक्युरिटी गार्ड व एक सुपरवायझर असतात. कंपनीत आल्यानंतर ड्यूटी लावण्याच्या कारणावरून वाघमारे व लोमटे यांच्यात सतत खटके उडत होते. वाघमारे यांनी सांगितलेल्या ठिकाणी सर्व सिक्युरिटी गार्ड काम करत.