बेकायदा गौणखनिज उत्खनन करणाऱ्या कंपनीला चार कोटींचा दंड

लोणावळा (प्रतिनिधी) – येथील खंडाळा विभागात टेकडीवर अनधिकृतपणे बेकायदा गौणखनिज उत्खनन करणाऱ्या पिडीलाईट इंडस्ट्रीज कंपनीला वडगाव मावळ तहसीलदार यांच्याकडून चार कोटी रुपयांचा दंड बजाविण्यात आला आहे. तसेच पुढील सात दिवसांत खुलासा करण्याचे सूचित करण्यात आले आहे. तशी नोटीस या कंपनीच्या नावे बजावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार खंडाळा विभागात सर्व्ह क्रमांक 41, 42 मधील प्लॉट क्रमांक 9, 11 व 12 याठिकाणी मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन करण्यात आले आहे. यासंदर्भात खंडाळा गावकामगार तलाठी यांनी 21 डिसेंबर रोजी सदर जागेची पाहणी करून पंचनामा केला होता.

पंचनामा अहवालात या ठिकाणावरून माती, मुरूम व दगड असे एकूण 5804 ब्रास इतक्‍या मोठ्या प्रमाणात गौणखनिज उत्खनन करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार वडगाव मावळ तहसीलदार यांनी संबंधित कंपनीला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 (7) नुसार या बेकायदा गौणखनिज उत्खनना साठी 4 कोटी 47 हजार 600 रुपये दंड बजाविला आहे. नोटीस मिळाल्यापासून पुढील 7 दिवसात यासंदर्भात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.