शहरातील चार गुन्हेगारांवर “एमपीडीए’ अंतर्गत कारवाई

वर्षभरासाठी येरवडा कारागृहात रवानगी

पुणे – शहरातील लोकसभा निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी चार सराईत गुन्हेगारांवर “एमपीडीए’ (महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ऍक्‍टिव्हिटी) कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. वर्षभरासाठी चारही गुन्हेगारांची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. शगुन राजू जोगदंड (24, ताडीवाला रोड), सागर उर्फ यल्या इरप्पा कोळानट्टी (महात्मा फुले वसाहत, ताडीवाला रोड), गोविंदसिंग पापुलसिंग टाक (20, गुलटेकडी), लखन रोहिदास जगताप (30, तळजाई वसाहत, पद्मावती) यांच्याविरोधात “एमपीडीए’ कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

यातील सर्व गुन्हेगार परिमंडळ-2 अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील आहेत. कायदा व सुव्यवस्थेसाठी या गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांच्याकडे देण्यात आला होता. यानुसार पोलीस आयुक्तांनी याला मंजुरी दिली. परिमंडळ-2च्या हद्दीतील पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील एकूण
16 गुन्हेगारांना आजवर तडीपार करण्यात आले असून इतरांवर नियोजित कारवाई सुरू आहे. तसेच, तडीपारीचा आदेश भंग केल्याबाबत 10 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांच्या मनातील भीती दूर होऊन शांततेत आणि निर्भय वातावरणात निवडणुका पार पडाव्यात, यासाठी आवश्‍यक ती खबरदारी घेण्यात येत असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.