पळून गेल्याने वाचला चार मुलांचा जीव

विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न

मंचर – नवऱ्याच्या रोजच्या भांडणाला कंटाळून विवाहितेने चांडोली खुर्द (ता. आंबेगाव) येथील घोडनदी पात्रात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला; परंतु स्थानिक नागरिकांनी महिलेला सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले. तसेच तिच्या चार मुलांनी तेथून पळ काढल्याने ते बचावले. ही घटना मंगळवारी (दि. 24) सकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार गवंडी कामानिमित्त सुनील जाधव आणि त्यांची पत्नी लता (रा. इंदिरानगर, मंचर, मूळ रा. भूम-परांडा) मंचर शहरात आले होते. पती सुनील हा नेहमीच विविध कारणांवरून पत्नी लता यांना मारहाण करायचा. नेहमी होणाऱ्या भांडणाला कंटाळून लता ही रामेश्‍वरी (वय 6), प्रदीप (वय 10), प्रतीक्षा (वय 8) आणि प्रतिज्ञा (वय 11) यांना घेऊन भाऊ नितीन सुरेश मोहिते यांच्यासोबत मंचर-मोरडेवाडी येथे गेल्या काही दिवसांपासून राहत होती. पंधरा दिवसांपूर्वी पती सुनील हा पत्नी लताकडे आला व आपण आता भांडण करायचे नाही, तुला व्यवस्थित नांदवितो, असे सांगून लताला मुलांसह मोरडेवाडी घेऊन गेला.

सोमवारी (दि. 23) रात्री लता हिच्याबरोबर सुनीलने पुन्हा भांडण करून मारहाण केली. तसेच मंगळवारी सकाळीही सुनिलने लताशी भांडण केले. नेहमी होणाऱ्या भांडणाला कंटाळून लता हिने सोबत चारही मुलांना घेऊन चार किलोमीटर अंतरावर चांडोली येथील घोडनदी पात्राकडे धाव घेतली. लता हिने पोटच्या चारही मुलांना नदीपात्रात ढकलण्याचा प्रयत्न केला; परंतु घाबरलेल्या मुलांनी बाजूने पळ काढल्याने ते बालंबाल बचावले; परंतु लता हिने स्वतःच्या जीवाचा मागचा पुढचा विचार न करता घोडनदी पात्रात उडी मारली. त्यावेळी तेथे ठाकर समाजातील मच्छिमारीसाठी आलेल्या तरुणांनी लताला नदीपात्राबाहेर काढले.

तसेच स्थानिक ग्रामस्थांनी मंचर येथील अमित काटे यांच्या रुग्णवाहिकेतून बेशुद्ध असलेल्या लता यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी आणले. या घटनेला लताचा पती सुनिल हा जबाबदार असल्याचा आरोप त्यांचा भाऊ नितीन मोहिते यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.