अकोले – माघारीच्या अंतिम दिवशी आज अकोले विधानसभा मतदारसंघातून दोन पक्षांनी उमेदवारी अर्ज मागे आहेत. त्यामुळे लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, युती व आघाडीत सरळ लढत होणार आहे.
छाननीच्या दिवशी अनंत पावडे या अपक्षाचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता. आज पिंपरी-चिंचवडच्या माजी महापौर शकुंतला धराडे व गणेश मधे या दोघांनी आपापले अर्ज मागे घेतले. या दोन्ही अपक्षांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने चौरंगी लढत होत आहे. लढत चौरंगी, सामना मात्र सरळ, असे चित्र आहे. याचे कारण म्हणजे वंचित आघाडीचे उमेदवार दीपक यशवंत पथवे आणि अपक्ष उमेदवार भिवा रामा घाणे हे या लढतीत किती मते घेतात? यावरच खरे तर त्यांचे भविष्य ठरणार आहे.
पण खरी लढत महायुतीचे उमेदवार व माजी आमदार वैभव पिचड आणि आघाडीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांच्यातच होणार आहे. निवडणुकीच्या प्रचाराचा जोर आता सुरू झाला आहे. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडणार आहे. त्याची पातळी काय राहील, यावरही निवडणूक प्रचार चित्र स्पष्ट होणार आहे.