Pune Cirme | खंडणीसाठी शेअर ट्रेडर तरूणाचे अपहरण करणाऱ्या चौघांना अटक

चतुःशृंगी पोलिसांची कामगिरी

पुणे, दि. 15 – खंडणीसाठी शेअर ट्रेडर तरूणाचे मोटारीतून अपहरण करून हातपाय बांधून मोबाईल, अंगठी, घड्याळ, एटीएम काढून घेणाऱ्या चौघांना चतुःशृंगी पोलिसांनी अटक केले. मोहित हेमंत वेदपाठक (वय ३२, रा. खराडी, मूळ- लोहा नांदेड), अक्षय दिलीप गिरीगोसावी (वय २७, रा. येरवडा), मारूती नंदू पवार (वय ३४, माले, मुळशी) आणि नरहरी मोतीराम भावेकर ( वय ३१, वळणे सोनारवाडी, मूळशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

फिर्यादी तरूण शेअर ट्रेडर असून त्याची आरोपी मोहित वेदपाठक सोबत ओळख होती. फिर्यादीला मोठ्या प्रमाणात रक्कम मिळणार असल्याची माहिती मोहितला होती. त्यामुळे त्याने तीन साथीदारांच्या मदतीने १० मेला बाणेरमधून तरूणाचे अपहरण केले. त्यानंतर आरोपींनी तरूणाचे हात-पाय बांधून मुळशीतील एका शेतामध्ये नेले. त्याठिकाणी मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल, घड्याळ, अंगठी काढून घेत १५ लाखांची खंडणी मागितली. त्यानंतर तरूणाने त्यांना रक्कम देण्याची तयारी दर्शविल्यामुळे आरोपींनी त्याला १२ मे ला बाणेरमध्ये सोडून दिले. त्यानंतर तरूणाने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात जाउन तक्रार दिली.

गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे आणि पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांनी दोन टीम तयार केल्या. सहायक पोलीस निरीक्षक संतोष कोळी आणि पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांच्या टीमने आरोपींचा शोध सुरू केला. गुन्ह्यातील मुख्य आरोपी मुळशीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार चतुःशृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन मुख्य आरोपीसह चौघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.