पोलीस अधीक्षकांकडून एलसीबी टीमला 35 हजारांचे बक्षीस
नगर/संगमनेर – दहा कोटींच्या खंडणीसाठी संगमनेरातून शालेय मुलाचे अपहरण करण्याचा प्रकार समोर आला आहे. मुलाचे अपहरण केल्यानंतर अपहरणकर्त्यांनी कापड व्यावसायिक असलेल्या मुलाच्या वडिलांना फोन करून खंडणीची मागणी केली. मात्र पोलिसांनी वेगाने तपास करत अपहरणकर्त्यांचा माग काढल्याने खंडणीखोरांनी मुलाला शहरा जवळील खेड्यात सोडून दिले. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी तिघा संशयितांना ताब्यात घेतले.
संगमनेर येथील कटारिया क्लॉथचे संचालक मनोज कटारिया यांचा मुलगा दक्ष (वय-12 वर्ष) हा ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये शिकण्यास आहे. सकाळीच तो नेहमी प्रमाणे शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडला होता. घरापासून काही अंतरावर स्कूलबसची वाट पाहत असताना इंडिकामधून आलेल्या अपहरणकर्त्यांनी त्याला उचलून इंडिकामध्ये टाकले व तेथून पलायन केले.
काही वेळानंतर अपहरणकर्त्यांनी मुलाच्या पालकांना फोन करत अपहरण केल्याचे सांगितले. घाबरलेल्या पालकांनी शाळेत व बसचालकाकडे चौकशी केली असता मुलगा शाळेत आला नसल्याची माहिती त्यांना समजली. त्यामुळे त्यांनी लगेचच ही माहिती पोलिसांना दिली. दरम्यानच्या काळात अपहरणकर्त्यांनी मेसेजद्वारे त्यांच्याकडे दहा कोटीची खंडणीची मागणी केली होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने तपास सुरु केला. पोलिसांना मिळालेली माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी शोध सुरु केला.
पोलीस संशयितापर्यंत पोहोचल्याचा सुगावा लागल्याने आरोपींनी मुलाला संगमनेर नजीक सुकेवाडी येथे सोडून दिले. सुकेवाडी येथे हा मुलगा एका तरुणाला आढळून आल्यानंतर त्याने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने मुलाला ताब्यात घेतले.
तसेच याप्रकरणी विरेश शाम गिरी (वय-35), मयुर प्रकाश उदावंत (वय-21 दोघे संगमनेर), जनार्दन खंडु बोडखे (वय 19 रा. शनी चौक, जि. नाशिक), सचिन पोपट लेवे या चौघा संशयिताना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी सुरु केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी दिली आहे.
या प्रकरणातील आणखी काही फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, अभय परमार, संदीप पाटील, सचिन अडबल, देवा काळे, रविंद्र कर्डीले, शंकर चौधरी, दिगंबर कारखिले, योगेश सातपुते, संदीप दरंदले, रवि सोनटक्के, शिवाजी ढाकणे, दिपक शिंदे, मेघराज कोल्हे यांच्या पथकाने कारवाई केली. याटीमला पोलीस अधीक्षकांकडून 35 हजार रुपयांचे बक्षिस जाहिर केले आहे.