हलगर्जीपणाचे ‘कारंजे’; जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी गटारात

तब्बल 5 ते 6 तासांनंतर दुरुस्तीसाठी आले कर्मचारी


भामा-आसखेड प्रकल्प अधिकाऱ्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न

वडगावशेरी – एकीकडे पाण्याची भीषण टंचाई असताना दुसऱ्या बाजूला मुख्य जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्याचे चित्र शुक्रवारी सकाळी 6 च्या सुमारास विमाननगर भागातील दत्त मंदिर चौकात दिसून आले. तर, जलवाहिनी दुरुस्तीसाठी तब्बल 5 ते 6 तासांनी कर्मचारी आल्याने संतप्त भावना व्यक्‍त होत आहेत.

विमाननगर परिसरात सध्या भामा-आसखेड येथून येणाऱ्या जलवाहिनीचे काम सुरू आहे. तर, पुणे शहराची जुनी पाइपलाइन येथूनच जाते. त्याच दरम्यान, टाटा गार्डरूमला सोडणार पाणीपुरवठा गुरुवारी बंद असल्याने भाम-आसखेडच्या जलवाहिनीत पाणी “रिवर्स’ झाले, असा अनोखा दावा करत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या पाणी नासाडीचे खापर दुसऱ्यांवर फोडण्याचा प्रयत्न केला आहे. पण, या छोट्याशा चुकीमुळे व्हॉल्व्हवर दबाव येऊन लाखो लिटर पाणी वाया जाण्याचा प्रकार झाला, त्याबद्दल अधिकारी ठोस उत्तर देण्यास तयार नाहीत.

सध्या भामा-आसखेड प्रकल्पाचे काम सुरू आहे. मग भामा-आसखेड जलवाहिनीत पाणी येणाचे कारण काय? असे अनेक प्रश्‍न तयार होत असून भामा-आसखेड प्रकल्प अधिकारी व मनपा अधिकाऱ्यांचा या भागात पाणी पुरवठ्याविषयी कोणताही ताळमेळ नाही. त्यामुळे हा लाखो लिटर पाणी वाया जाण्याचा प्रकार झाला याला जाबदार कोण? असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत. या भागात पाणीटंचाई भीषण रूप घेत आहे. तर त्यात अनेक सोसायटी टॅंकरने पाणी मागवत आहेत. अशी स्थिती असतानाही फक्‍त हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. दरम्यान, या प्रकारची चौकशी होऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

जलवाहिनी का फुटली, याबद्दल मला काही माहिती नाही. भामा-आसखेड जलवाहिनी तपासणीचे काम सुरू होते. त्यांनी कोठून कशी जलवाहिनी जोडली, याबद्दल मला सांगता येणार नाही. या पाणी गळतीमध्ये आमचा काही दोष नाही.
– दत्तात्रेय चांभारे, कनिष्ठ अभियंता, मनपा.

Leave A Reply

Your email address will not be published.