“प्रतापगड’मध्ये संस्थापक पॅनेलचा दणदणीत विजय

कुडाळ -संपूर्ण जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या जावळी तालुक्यातील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत संस्थापक सहकार पॅनेलने सर्व 21 जागा पटकावल्या आहेत. या पॅनेलचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असून, सभासदांनी सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांच्या नेतृत्वाखालील कारखाना बचाव पॅनेलचा साफ धुव्वा उडाला. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच शिंदे समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केली.
कारखान्याचा गळीत हंगाम चार वर्षे बंद असल्याने ऊस उत्पादकांची ससेहोलपट सुरू असल्याचा आरोप होता. त्यामुळे असलेल्या नाराजीचा फायदा निवडणुकीत होण्याची बचाव पॅनेलच्या धुरिणांची अपेक्षा होती; परंतु सभासदांनी संस्थापक पॅनेलच्या सर्व उमेदवारांना बाराशेहून अधिक मताधिक्य दिले. माजी आमदार लालसिंगराव शिंदे यांचे निष्ठावान कार्यकर्ते सौरभ शिंदे यांच्या पाठीशी आजही ठाम असल्याचे या निकालाने स्पष्ट झाले आहे. संस्थापक पॅनेलने तीन जागा यापूर्वीच बिनविरोध केल्या होत्या.
उर्वरित 18 जागांसाठी रविवारी मतदान झाले. मेढ्यातील बाबासाहेब शिंदे आखाडकर सभागृहात सोमवारी मतमोजणी झाली. विजयी उमेदवार व कंसात त्यांना मिळालेली मते – राजेंद्र रामचंद्र शिंदे (2221), सौरभ राजेंद्र शिंदे (2179), सुनेत्रा राजेंद्र शिंदे (2135), आनंदराव सदाशिव मोहिते (2121), शांताराम रामराव पवार (2117), अंकुश यादवराव शिवणकर (2105), रामदास निवृत्ती पार्टे (2130), आनंदराव मानसिंग शिंदे (2147), प्रदीप मारुती तरडे (2122), आनंदराव हरिबा जुनघरे (2144), शिवाजी साहेबराव मर्ढेकर (2115), बाळासाहेब गणपत निकम (2118), गणपत रामचंद्र पार्टे (2110), जयवंत उर्फ नानासाहेब जनार्दन सावंत (2066), दिलीप यशवंत वांगडे (2069), बाळकृष्ण लक्ष्मण निकम (2213), कुसुम लक्ष्मण गिरीगोसावी ( 2177). शोभाताई बारटक्के, ताराबाई पोपळे, विठ्ठल मोरे हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत.
सभासदांचा विश्वास सार्थ ठरवणार
मतदारांनी आमच्यावर पुन्हा विश्वास दाखवल्याने जबाबदारी वाढली आहे. येत्या दिवाळीला शरद पवार यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून कारखाना सुरू करणार आहे. माजी आमदार (दिवंगत) लालसिंगराव शिंदे, माजी चेअरमन राजेंद्र शिंदे यांचे आशीर्वाद, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ.शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, माजी आमदार सदाशिव सपकाळ, वसंतराव मानकुमरे, जिल्हा बॅंकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांचे मार्गदर्शन, सभासदांच्या विश्वासामुळेच विजय मिळाल्याची प्रतिक्रिया सौरभ शिंदे यांनी व्यक्त केली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही गुलाल आमचाच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विजयी संचालकांना सहकार्य करणार
एक हजार सभासदांनी आम्हाला कौल दिला आहे. विजयी पॅनलचे मी मनापासून अभिनंदन करतो. मनात आकस न ठेवता आम्ही कारखाना सुरू होण्यासाठी सहकार्य करू. साखर कारखाना लवकरात लवकर सुरू करून शेतकऱ्यांची गळचेपी थांबवावी, असे आवाहन दीपक पवार यांनी केले.





