विविधा: सुएझ कालव्याची पायाभरणी

माधव विद्वांस

भारत आणि युरोप यातील सागरी अंतर कमी करणाऱ्या सुएझ कालव्याची पायाभरणी 25 एप्रिल 1859 रोजी झाली. याला आज 160 वर्षे पूर्ण झाली. सुएझ कालव्याचे अरबी नाव कनात स-सुवेस. 17 नोव्हेंबर 1869 रोजी हा कालवा वाहतुकीस अधिकृतरीत्या खुला करण्यास आला. इजिप्तच्या सुएझ भूमीतून 162 किमी लांबीच्या या कालव्यामुळे भूमध्य समुद्र व दक्षिणेकडील सुएझ आखात-तांबडा समुद्र एकमेकांना जोडले गेले आहेत. पोर्ट सैद कालव्याच्या उत्तर टोकाशी तर सुएझ बंदर (पोर्ट तौफीक) दक्षिण टोकाशी आहे. दोन्ही बाजूंकडील समुद्रातील पाण्याच्या पातळीबरोबर कालव्यातील पाण्याची पातळी ठेवण्यात आलेली आहे.

जहाजांना या कालव्याच्या सुविधेमुळे अटलांटिक महासागरातून भूमध्य समुद्र, तांबडा समुद्र व अरबी समुद्रामार्गे थेट हिंदी महासागरात जाता येते. सुएझ कालवा होण्यापूर्वी यूरोपकडून आग्नेय आशियाकडे जाणाऱ्या जहाजांना आफ्रिकेच्या दक्षिण टोकावरील केप ऑफ गुड होपमार्गे संपूर्ण आफ्रिका खंडाला वळसा घालून जावे लागे. केप ऑफ गुड होप सागरी मार्गाच्या तुलनेत या मार्गाने लंडन-मुंबई यांमधील अंतर सुमारे 7,178 किमीने कमी झाले आहे. इ.स. पूर्व विसाव्या किंवा एकोणिसाव्या शतकात इजिप्तच्या राजांनी नाईल नदी व तांबडा समुद्र यांना जोडणारा पश्‍चिम-पूर्व कालवा काढलेला होता; परंतु तो दुरुस्तीअभावी निरुपयोगी झाला.

त्यानंतर इ.स. पूर्व सुमारे 600 मधे तसेच फेअरो नेको, इ.स. पूर्व सुमारे 500 डरायस द ग्रेट व इ.स. पूर्व सुमारे 250 मध्ये दुसरा टॉलेमी वगैरे राजांनी या कालव्याचे पुन्हा खुदाईचे काम हाती घेतले होते. इ.स.नंतर पंधराव्या शतकात व्हेनेशियन लोकांनाही इ.स. 1500 मध्ये, तर फ्रेंचांनी इ.स. सतराव्या शतकात, सुएझ जोड भूमीतून भूमध्य समुद्र व सुएझ आखात यांना कालव्याने जोडता येईल अशी कल्पना मांडली होती; परंतु त्याचा पाठपुरावा केला गेला नाही. पुढे अठराव्या शतकाच्या अखेरीस नेपोलियन लष्करी अधिकारी असताना इजिप्तच्या मोहिमेवर गेला असताना त्याला तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र जोडण्याची कल्पना सुचली. याला चालना मिळाली ती इ.स. 1830 मधे.

इजिप्तमध्ये राजदरबारी असलेल्या फर्दिनान्द द लेसेप्स (इ.स.1805-94) या फ्रेंच मुत्सद्दी अभियंत्यामुळे. त्याच्या प्रयत्नास यश येऊन या योजनेस प्राथमिक मंजुरी मिळाली. फर्डिनांडने इजिप्तचे राज्यपाल सैद पाशा याजकडून दोन सवलती मिळविल्या आणि फ्रान्स हा कालवा बांधून देण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यानुसार इ.स. 1858 मधे सुएझ कॅनल कंपनीची स्थापना झाली. या कंपनीमार्फत कालव्याचे खोदकाम व बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हा कालवा सर्व देशांसाठी वाहतुकीला खुला ठेवावा आणि 99 वर्षांच्या कराराने कंपनीने जकात कराचे उत्पन्न घ्यावे, असे ठरले.

कालवा खणताना गुंतागुंतीच्या तांत्रिक अडचणी व ग्रेट ब्रिटनसारख्या देशांनी काही राजकीय अडचणी निर्माण केल्या. पण या सर्वांवर मात करून लेसेप्स याच्या देखरेखीखाली अकरा वर्षांत जगातील समुद्र जोडणारा हा प्रकल्प कार्यान्वित झाला. कालव्याच्या प्रवाहात मॅन्झाला, टिमसाह, ग्रेट बिटर व लिटल बिटर या वाटेवर असलेल्या सरोवरांचा अभियंत्यांनी चपखल उपयोग करून घेतला. हा कालवा 25 एप्रिल 1859 रोजी वाहतुकीसाठी कार्यान्वित झाला. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 9 कोटी 24 लाख 14 हजार डॉलर खर्च आला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.