हिंगोली : सध्या राज्यात निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे. या निवडणुकीत कोणाला यश मिळते तर कोणाला अपयश येते. या निवडणुकीसाठी लोक काय करतील याचा नेम नाही. आज आपण एका अश्या नेत्याबद्दल जाणून घेऊया त्याने आपल्या आयुष्यात 22 निवडणुका लढल्या आणि अजूनही लढत आहे. मात्र या सर्व निवडणुकीमध्ये त्याला पराभव स्वीकारावा लागला. चला तर या नेत्याबद्दल जाणून घेऊया…
वसमत शहरातील रहिवासी असलेले दिगंबर नाईकवाडे (वय 73) यांनी आत्तापर्यंत 22 निवडणुका लढल्या आहेत. मागील पन्नास वर्षापासून दिगंबर नाईकवाडे वेगवेगळ्या निवडणुका लढत आहेत. राजकारणातून समाजकार्य करावे, सत्ता आल्यानंतर जनतेचे प्रश्न सोडवता येतील असा विश्वास नाईकवाडे यांना होता. त्यामुळे दिगंबर नाईकवाडे यांनी ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका ,विधानसभा आणि लोकसभा अशा वेगवेगळ्या 22 वेळा निवडणुका लढवल्या आहेत. 1995 या काळात विधानसभा निवडणुकांसाठी दिगंबर नाईकवाडे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज भरला होता.
निवडणुका म्हटलं की पैसा आलाच आणि नाईकवाडे यांच्याकडे तर पैसा नव्हता. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे बागायती शेती असलेली सात एकर शेती विकण्याचा निर्णय घेतला. जमीन विकून मिळालेल्या पैशातून निवडणूक लढायची आणि विजयी झाल्यानंतर विकलेली जमीन परत घेऊ असा विश्वास होता.
त्यामुळे लाख मोलाचे असलेली रोड लगतची सात एकर बागायती जमीन तेव्हा दिगंबर नाईकवाडे यांनी विकली. त्या जमिनीतून मिळालेला पैसा निवडणुकीच्या प्रचारात कार्यकर्त्यावर पैसे खर्च केला. प्रचारासाठी गाड्या भाड्याने लावणे या विविध कारणासाठी हा पैसा खर्च केला. मात्र या सगळ्या निवडणुकांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला.
पोरांनीदेखील साथ सोडली
पैसे नसल्यामुळे कार्यकर्ते सुद्धा जवळ फिरकत नव्हते, असे असताना सुद्धा नाईकवाडे यांनी त्यांचे काम न थांबवता सुरूच ठेवलं. तेव्हापासून आतापर्यंत हे काम सुरूच आहे. नाईकवाडे यांनी तब्बल 22 निवडणुका लढल्या आहेत. आज त्यांचं वय 73 वर्ष इतकं आहे. बागायती असलेली जमीन विकली त्यामुळे जवळ कोणतीही मालमत्ता राहिली नाही. वडिलांनी जमीन विकली त्यामुळे नाईकवाडे यांच्या मुलांनीही त्यांची साथ सोडली. आता दिगंबर नाईकवाडे आणि त्यांची पत्नी दोन रूम असलेल्या पत्र्याच्या घरात राहत आहेत.
जिद्द नाही सोडली
या विधानसभा निवडणुकीत नाईकवाडे यांनी पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज भरला आहे. जवळ असलेले पैसे संपल्याने कार्यकर्ते दूर पाळले. त्यामुळे दिगंबर नाईकवाडे यांनी स्वतः लाऊडस्पिकर मधून प्रचार सुरू केलाय. दिगंबर नाईकवाडे यांच्या संसाराचा गाडा आता त्यांची पत्नी चालवत आहेत. कधीकाळी सात एकर जमिनीची मालकीण असलेली बाई आज दुसऱ्याच्या शेतामध्ये दोनशे रुपये रोजाने कामाला जातात आणि आपला संसार चालवतात.