- मंडई येथील खोदकामावेळी सापडले अवशेष
- पुरातत्व विभागाचे अधिकारी आज करणार पाहणी
- मोठ्या कालखंडाचा उलगडा होण्याची शक्यता
गायत्री वाजपेयी
पुणे – मंडई परिसरात सुरू असलेल्या मेट्रोच्या खोदकामात अज्ञात प्राण्याचे अवशेष आढळले. हे अवशेष आकाराने मोठे आहेत. ते किमान दोन हजार वर्षांपूर्वीचे असावेत, असा पुरातत्त्व विभागाच्या शास्त्रज्ञांचे मत असल्याने त्याबाबतचे कुतूहल वाढले आहे. तसे असल्याचे शास्त्रीय चाचणीत निष्पन्न झाले, तर त्यातून पुण्याच्या इतिहासावर वेगळा प्रकाशझोत पडण्याची शक्यता आहे.
मंडई येथे मेट्रो स्थानकासाठी खोदकाम सुरू आहे. बुधवारी (दि.24) कामगारांना सुमारे 10 मीटर खोलीवर हाडे आढळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी हळुवारपणे खोदकाम करत, ही हाडे बाहेर काढली. हाडांचा आकार मोठा असून, ती हत्तीसदृश प्राण्याची असल्याचे सांगितले जात आहे. मेट्रोच्या कामगारांनी ही हाडे तेथेच एका पोत्यामध्ये जमा करून ठेवली आहेत. दरम्यान, “प्रभात’चे माजी पत्रकार चंद्रकांत दळवी यांनी “प्रभात’ला याबाबत माहिती दिली. प्रत्यक्ष पाहणीत ही अवशेष कामाच्या ठिकाणी उघड्यावर पडल्याचे आढळले. याबाबत मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, अद्याप याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
पुरातत्त्व खात्याच्या अंदाजानुसार, ही हाडे दोन हजार वर्षांपूर्वीची असावीत. त्यामूळे सध्या केवळ 14-15 व्या शतकापासूनच्या ज्ञात इतिहासापेक्षा या पुरातन शहराच्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या स्थितीचा उलगडा होणार आहे. या जीवाश्मांची पाहणी करण्याला पुरातत्त्व खात्यातील तज्ज्ञ गुरूवारी सकाळी भेट देणार आहेत. या पाहणीतून त्याचे गुढ उलगडण्याला मदत होणार आहे.
पुणेकरांत कुतुहल अन् मस्तानीचा हत्ती
हे नेमके कोणत्या प्राण्याचे अवशेष आहेत, याबाबत रंजक चर्चा मंडईच्या कट्ट्यावर सुरू आहेत. पुणे शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांपासून ते शिवाजी महाराजांचा काळ आणि पुढे पेशवाई, स्वातंत्र्य संग्राम या सगळ्याच विषयात पुणे कायमच धगधगते राहिले आहे. हे जीवाश्म सापडल्यानंतर साहजिकच तेथील स्थानिक नागरिकांनी “मस्तानीच्या पाग्यातील हत्ती असेल’ असे भाकीत वर्तवले.
प्रथमदर्शनी हे अवशेष जीवाश्म स्वरूपातील असावेत. या अवशेषांची झीज झाली आणि ज्या खोलीवर ती सापडली आहेत, त्यानुसार ही तब्बल दोन हजार वर्षापूर्वींची असण्याची शक्यता आहे. मात्र, याचा अचूक कालखंड कोणता आणि कोणत्या प्राण्याचे हे अवशेष आहेत, याबाबत सखोल संशोधनांतरच निश्चितपणे सांगता येईल. त्यामुळेच मंडई येथील हाडांबाबत सविस्तर अभ्यास महत्वाचा ठरेल.
– डॉ. सचिन जोशी, पुरातत्त्व विभागाचे शास्त्रज्ञ
मेट्रोच्या कामादरम्यान आढळलेली ही हाडे हा महत्त्वाचा पुरातत्व शास्त्रीय पुरावा आहेत. त्यामुळे ही हाडे तातडीने पुरातत्व विभागाकडे देऊन त्याबाबत अधिक अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यानंतरच या अवशेषांबद्दल तसेच, आपल्याकडील तत्कालीन ऐतिहासिक परिस्थितीबद्दल महत्त्वाची माहिती मिळू शकेल.
– मंदार लवाटे, इतिहास अभ्यासक
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा