ममतांचे चाळीस आमदार आपल्या संपर्कात – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मोदींचा बंगाल मधील जाहीरसभेत दावा

कोलकाता – येत्या 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पश्‍चिम बंगाल मधील चाळीस आमदार भाजप मध्ये प्रवेश करतील आणि तृणमुल कॉंग्रेस सरकारच्या पतनाला सुरूवात होईल असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या राज्यातील सेरामपोरे येथील जाहींरसभेत बोलताना केले. हे ठिकाण कोलकातापासून जेमतेम 30 किमी अंतरावर आहे. आजही तुमचे चाळीस आमदार माझ्या संपर्कात आहेत असे विधान त्यांनी केले.

देशाच्या विविध भागात भाजपचे जे जागांचे नुकसान होणार आहे ते भरून काढण्यासाठी भाजपने पहिल्यापासूनच बंगालवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्या राज्यातील 42 पैकी किमान 25 जागा जिंकण्याचे लक्ष भाजने ठेवले असून त्यानुसारच मोदींनी तेथे आक्रमकपणे जाहींरसभा घेतल्या आहेत. आजच्या सभेत त्यांनी प्रथमच तृणमुल कॉंग्रेसच्या आमदारांबाबत हे विधान केल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. लोकसभा निवडणुकीनंतरच्या काळात ममतांना राज्यातील सरकार चालवणे अत्यंत जिकरीचे जाईल असा इशाराही मोदींनी दिला. ममतांच्या सहकाऱ्यांनी अनेक घोटाळे करून लोकांचा विश्‍वासघात केला आहे असा आरोप त्यांनी केला. या राज्यात बाहेरील देशातील घुसखोर सुखात राहु शकतात. पण रामभक्त, दुर्गाभक्त आणि सरस्वती भक्तांना मात्र कायम येथे दहशतीच्या वातावरणात राहावे लागत आहे असेही मोदींनी यावेळी नमूद केले.

मोदींचीच एक्‍सपायरी संपत आली
मोदींच्या या दाव्यावर तृणमुल कॉंग्रेसनेही तातडीने पलटवार केला आहे. या पक्षाचे नेते डेरेक ओब्रीयन यांनी म्हटले आहे की मोदींचेच दिवस आता भरत आले असून या सरकारची एक्‍सपायरी डेट जवळ आली आहे. तृणमुल कॉंग्रेसचे आमदारच काय पण आमच्या पक्षाचा साधा एक नगरसेवकही त्यांच्या संपर्कात नाहीं. त्यामुळे त्यांनी खोटे दावे करून आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नये असेही त्यांनी म्हटले आहे. तुम्ही या राज्यात निवडणूक प्रचार करायला आला आहात की आमदारांचा घोडेबाजार करायला आला आहात असा सवालही त्यांनी मोदींना केला आहे. या घोडेबाजाराबद्दल आम्ही मोदींच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोंत असेही त्यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.