91 वर्षीय आजोबांकडून किल्ले शिवनेरी सर

बेळगावच्या बैजू पाटील यांचा सळसळता उत्साह

जुन्नर (प्रतिनिधी)  – बेळगावच्या बैजु पाटील या 91 वर्षीय तरुणाने किल्ले शिवनेरी सर करीत छत्रपती शिवरांयाप्रती आदर व्यक्‍त केला. या वयातही त्यांचा सळसळता उत्साह आजच्या पीढिला आदर्शवत ठरणारा असाच आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी किल्ले शिवनेरीचे दरवाजे पर्यटक आणि शिवभक्तांसाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर शासनाने काही नियम व अटी यांचे बंधन कायम ठेवून धार्मिक स्थळे तसेच पर्यटन स्थळ यावरील बंदी शिथिल केली आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघ आता सर्वत्रच वाढताना दिसून येत आहे.

किल्ले शिवनेरी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असल्याने देशभरातून नागरिक या पवित्र भूमीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. छत्रपती शिवाजी महाराज हे अबालवृद्धांपासून सर्वांचे श्रद्धास्थान तसेच स्फूर्तिस्थान असल्याने सर्वानाच एकदातरी शिवजन्मभूमीला भेट देण्याची मनीषा असते. त्यामुळे किल्ले शिवनेरी वरील शिवजन्मस्थळाला भेट देणाऱ्या मावळ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

“आजपर्यंत 10 पेक्षा जास्त गडकिल्ले फिरलो असून शिवनेरी वरील शिवजन्मस्थळावर नतमस्तक झाल्याने धन्य झालो आहे. युवकांनी महाराजांच्या इतिहासातून प्रेरणा घ्यावी, महाराजांच्या व्यक्तिमत्वातला एक जरी अंश प्राप्त झाला तर ती ऊर्जा आयुष्यभर पुरेल.
-बैजू भीमा पाटील, बेळगाव

बैजू भीमा पाटील हे आजोबा वयाच्या 91 व्या वर्षी किल्ले शिवनेरीवर आपल्या दैवताचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. याबाबत त्यांना विचारणा केली असता, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळाचे दर्शन घेतल्यामुळे झालेला आनंद गगनात मावेनासा झाला. शब्दांत वर्णन करता येणार नाही.

महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घ्यायचे या एकाच इच्छेपायी किल्ले शिवनेरी वयाच्या 91 व्या वर्षी सर केलेले आजोबा भारावून बोलत होते. त्यांच्या सोबत त्यांचे नातेवाईक गोपाळ पन्हाळकर (वय 64) यांनीही आजोबांसोबत किल्ले शिवनेरी ला भेट दिली.

बैजू भीमा पाटील हे मूळचे बेळगाव मधील असून असून सध्या शाहूनगर पुणे येथे वास्तव्यास आहेत. किल्ले शिवनेरीवर वयोवृद्ध नागरिकांना शिवजन्मस्थळाचे दर्शन घेणे सुलभ व्हावे याकरिता रोप वे करण्यात यावा अशीही अपेक्षा अनेक शिवभक्त व पर्यटकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.